शाळेतून रडतच घरी परतले होते उद्धव ठाकरे; बाळासाहेबांमुळे 'संकट' टळले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:13 AM2020-02-11T06:13:26+5:302020-02-11T11:23:34+5:30

जयंत पाटील रमायचे २० मिनिटांच्या मॅचमध्ये; बालमोहन विद्यामंदिरातील शालेय आठवणींना दिला उजाळा

Chief Minister Thackeray also received 'Prasad' of teachers | शाळेतून रडतच घरी परतले होते उद्धव ठाकरे; बाळासाहेबांमुळे 'संकट' टळले!

शाळेतून रडतच घरी परतले होते उद्धव ठाकरे; बाळासाहेबांमुळे 'संकट' टळले!

Next

मुंबई : शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाळेत शिक्षकांच्या छडीचा ‘प्रसाद’ घेतला आहे, तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना तर कडक सरांकडून तितकाच ‘कडक प्रसाद’ मिळाला होता. याचा खुलासा या दोघा दिग्गजांनीच केला. सोमवारी दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत इयत्ता दहावीच्या १९७६ आणि ७७च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील हे दोघेही बालमोहनचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या सत्कारासाठी शाळेच्या सभागृहात सोमवारी ‘बालमोहन अभिमान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या दोघांनी शालेय जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या.
या आठवणी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत आमची टेस्ट मॅच व्हायची. सुट्टी झाली की, आम्ही धावत जाऊन वसईकरचा वडापाव खायचो. त्यानंतर, क्रिकेटचा डाव रंगायचा. सर्वांची बॅटिंग संपायला महिना लागायचा. आमचे वीस मिनिटांचे टाइम मॅनेजमेंट जोरात होते. एक दिवस वेळेचे भान चुकले आणि आम्हाला यायला उशीर झाला. वर्गात कामतबार्इंचा तास होता. चषक जिंकून उशिरा वर्गात आलेल्या आमच्या टीमला बार्इंनी एका रांगेत उभे केले आणि रांगेतच पारितोषिक वितरण सभारंभ पार पडला, अशी आठवण मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगताच सभागृहात हंशा पिकला.


तर, सातवीत असताना इनामदार सरांच्या तासात चांगलाच प्रसाद मिळाल्याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. तेव्हा मी, उज्ज्वल, मिलिंद आम्ही सर्व पहिल्या रांगेत एकामागे एक बसलो होतो. तेव्हा खिडकीत काही तरी होतेय असे जाणवले. ते पाहण्यासाठी आम्ही आमची बाके एका झटक्यात खिडकीजवळ सरकवली.


थेट खिडकीला चिटकवलीच. त्याने वर्गात हंशा पिकला, सरांना सुरुवातीला काही कळले नाही. मग त्यांना उमगले की, आमची तीन बाके बाजूला झाली आहेत. त्यानंतर, इनामदार सरांनी आम्हाला चांगलाच प्रसाद दिला. इनामदार सर कडक स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे त्यांनी तसाच ‘कडक प्रसाद’ दिला, अशी आठवण मंत्री जयंत पाटील यांनी सांगितली.

शाळेचा दुसरा दिवस थेट पुढच्या वर्षीच उगवला
शाळेचा दुसरा दिवस थेट पुढच्या वर्षी उगवल्याची आठवण मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी सांगितली. शाळेत यायची अजिबात इच्छा नव्हती. रडत रडतच पहिल्या दिवशी शाळेत आलो होतो. ‘माँ’ने मोठ्या मुश्किलीने शाळेपर्यंत आणले. तेव्हा शेणॉय बार्इंचा तास सुरू होता. ज्यांना शेणॉय बाई माहीत आहेत, त्यांना कल्पना असेल की, माझा पुढचा अख्खा दिवस कसा गेला असेल. रडत रडतच पहिला दिवस संपला. घरी पोहोचलो, ‘माँ’नेही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी, बाळासाहेबांपर्यंत विषय पोहोचला. त्यांनी थेट, ‘ठीक आहे, आत्ताच काही घाई नाही,’ असे सांगितले. मग माझा दुसरा दिवस थेट पुढच्या वर्षीच उगवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister Thackeray also received 'Prasad' of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.