मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:51 IST2023-07-12T15:49:44+5:302023-07-12T15:51:45+5:30
शरद पवार यांनी नाशिक, येवल्यातील दौऱ्या या भूमीचा इतिहास सांगताना तात्या टोपे यांचा उल्लेख केला होता.

मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले. तर, छगन भुजबळ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. विकासाच्या मुद्द्यावर आपण भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या पहिल्याच मेळाव्यात बोलताना म्हटलं. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांच्या या भूमिकेला विरोध करत, त्यांच्याविरुद्ध जनतेतून जाऊन प्रखर विरोध केला. विशेष म्हणजे शरद पवारांनी येवल्यात जाऊन छगन भुजबळांनाच आव्हान दिलं.
शरद पवार यांनी नाशिक, येवल्यातील दौऱ्या या भूमीचा इतिहास सांगताना तात्या टोपे यांचा उल्लेख केला होता. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदानही सांगितलं होत. आता, त्याच तात्या टोपेंच्या स्मारकासाठी मंत्री छगन भुजबळांनी १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले. स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाचा १ कोटी ५७ लक्ष रुपयांचा हिस्सा वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाच्या रखडलेल्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.
स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाचा १ कोटी ५७ लक्ष रुपयांचा हिस्सा वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाच्या रखडलेल्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे.
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 12, 2023
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहिल्या संग्रामातील प्रमुख सेनानी… pic.twitter.com/vH6N3XsljH
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहिल्या संग्रामातील प्रमुख सेनानी तात्या टोपे हे आपल्या येवल्याचा अभिमान आहेत. त्यांच्या अतुलनिय त्यागाचा व शौर्याचा प्रेरणादायी इतिहास कायम स्मरणात राहावा, यासाठी आपण येवला तालुक्यातील बाभुळगाव खु. येथे त्यांचे स्मारक विकसित करत आहोत. या स्मारकाचे काम निधी अभावी थांबलेले होते. काम पुन्हा सुरु करण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आले असून सांस्कृतिक कार्य विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
काय असेल स्मारकात
स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या या स्मारकात स्मृती उद्यान बांधण्यात येणार आहे. सदर उद्यानात माहिती केंद्र, शिल्पकृती,गॅलरी, प्रदर्शन हॉल, वाचनालय, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, प्रतिकात्मक शिल्प गार्डन, लेझर शो,कॅफेटेरिया, बगीचा, चिल्ड्रन पार्क, पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.