पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 05:30 AM2021-07-19T05:30:47+5:302021-07-19T05:31:15+5:30

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चेंबूर येथील भारतनगर भागात दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

chembur landslide Damage due to lack of drainage | पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर 

पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर 

Next

नितीन जगताप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चेंबूर येथील भारतनगर भागात दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चेंबूर येथील भारतनगर परिसरात ६५०० झोपड्या आहेत. डोंगरात या झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. डोंगरापलीकडचा भाग हा बीएआरसीच्या हद्दीत येतो. पलीकडचा भाग हा उंच आहे तर भारतनगरचा भाग डोंगराच्या पायथ्याला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भारतनगर येथील परिसरात येते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बीएआरसीने संरक्षण भिंतीला लहान नालेही तयार केले आहेत. परंतु झोपड्या अगदी भिंतीला चिकटून बांधण्यात आल्याने पाण्याचा निचरा व्हायला जागाच नाही. त्यामुळे पावसाचे पाणी या घरांच्या भिंतीमध्ये मुरते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात डोंगरावरून माती वाहून आली त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी नाला बंद झाला, त्यावर मातीचा थर साचला गेला. पाण्याचा जोरामुळे भिंत घरावर पडून दुर्घटना घडली. घराच्या ठिकाणी दरड कोसळू नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे परंतु त्या भिंतीच्या उंचीइतका चिखल साचला होता. जोरदार पावसामुळे ती संरक्षक भिंत दुमजली घरावर पडली, ते घर इतर घरांवर पडल्याने अनेकांचे जीव गेले.

नशीब बलवत्तर म्हणून वाचलो

- पाऊस कोसळत असताना रात्री साधारण १२.३० ते १ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने आम्ही घरातून बाहेर पळालो. बाहेर पाहिले तर आमच्याच घराच्या दुसऱ्या दरवाजावर कोसळलेल्या भिंतीचा सगळा मलबा येऊन अडकला होता. 

- त्याच दरवाज्याजवळ आमचा लहान मुलगा उभा होता. हा दरवाजा जर घटनेच्यावेळी उघडा असता तर त्याच्यासह आमच्याही जीवावर बेतले असते, अशी प्रतिक्रिया चेंबूर येथील रुखसाना खान यांनी दिली.
nसुनीता आणि आरती मानके या बहिणींनी सांगितले की, घरावर दरड कोसळल्याने मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही घराबाहेर पडलो. शॉर्टसर्किट झाल्यामुळे आम्हाला विजेचा झटका बसून पायाला जखमही झाली. पण सुदैवाने तेवढ्यावरच निभावले. 

- दरड वीज मीटरवर कोसळल्याने शॉर्टसर्किट झाले, पण वेळीच घराबाहेर पडल्याने जीव वाचल्याची भावना सैरउन्नीसा शेख यांनी व्यक्त केली. या घटनेवेळी आम्ही वरच्या माळ्यावर झोपलो होतो, त्यामुळे वाचलो. आमच्या घराचा खालचा भाग चिखलात बूडून गेला होता.

... अन् आईने हंबरडा फोडला!

येथील एक महिला दररोज रात्रपाळीला कामाला जाताना मुलीला आत ठेवून घराला बाहेरून कुलूप लावत असे. यामुळे घटनेच्यावेळी घरात एकट्या असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीला बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. जेव्हा तिची आई घरी आली तेव्हा मुलीची अवस्था पाहून आईने हंबरडाच फोडला.

एकाच कुटुंबातील ५ जणांचा बळी

या दुर्घटनेत येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि तीन मुलींचा समावेश आहे. दुसऱ्या एका घरात मुलगी आणि जावयासोबत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. मुलगी व जावई घरी नसल्याने वाचले.

डोळ्यासमोर घर कोसळले

रात्री १२.३०च्या दरम्यान लुघशंकेसाठी घराबाहेर गेलो होतो, त्याचवेळी दरड कोसळत असल्याचे मला दिसले. मी आणि माझ्या मुलांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली पण तोपर्यंत घरही पडल्याचे प्रत्यक्षदर्शी मुस्ताक खान यांनी सांगितले.

घटनाक्रम

- शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास चेंबूर येथील न्यू भारतनगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला.
- २.४५ वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागला माहिती देण्यात आली.
- २.०० च्या दरम्यान एनडीआरएफची टीम दाखल.
- २.३० मनुष्यबळ कमी असल्याने आणखी मदत मागविण्यात आली.
- ४.३०च्या सुमारास ५ जणांना बाहेर काढण्यात आले.
- ६. ३० वाजता आणखी काही जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्य सात जणांचा मृत्यू झाला होता, तर दोन जखमी होते.
- ८.१५ मृतांचा आकडा १२ झाला.
- १२.२० वाजता मृतांची संख्या १५ झाली.
- ४.३० मृत्यूचा आकडा १६ 
- रविवारी रात्री मृतांचा आकडा १९वर पोहोचला.

जबाबदार कोण?

पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून जे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले गेले त्यात आज दुर्घटना झालेल्या ठिकाणांना कोणत्याही नोटिसा देण्यात आल्या नव्हत्या, ही घटना अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी घरे देण्यासाठी आम्ही बैठक घेऊन उपाययोजना करू. - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकासमंत्री

स्थलांतराची समस्या कायमस्वरूपी मिटत नसल्याने या ठिकाणचे रहिवासी नाईलाजाने धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करतात. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नवे व्यापक धोरण अमलात आणणे गरजेचे आहे. - राहुल शेवाळे, खासदार

मध्यरात्री पावसाने रौद्ररूप धारण केले; क्षणात होत्याचे नव्हते झाले. चेंबूर भारतनगर परिसरात दरड कोसळून मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! ही घटना अतिशय दुर्दैवी; मन हेलावणारी आहे. - वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

चेंबूरमधील दुर्घटनेला जबाबदार कोण? महापालिका नेहमी ‘नैसर्गिक आपत्ती’ च्या मागे लपू शकत नाही. पालिका, राज्य सरकार केंद्र सरकार प्रत्येकाने आपापले कामे करायला हवेत. राजकारण खूप खालच्या थराला गेले आहे, लोकांना केवळ व्होटबँक म्हणून पाहिले जाते. पण त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविले जात नाहीत ते सोडविले पाहिजेत. - भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

Web Title: chembur landslide Damage due to lack of drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.