चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:13 IST2025-11-05T08:12:21+5:302025-11-05T08:13:17+5:30
शाळा प्रशासनाने यापुढे विद्यार्थिनींना अशी वागणूक देऊ नये यासाठी लेखी समज देणार असल्याचे शिक्षण विभागाने ‘लोकमत’ला सांगितले.

चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये काही विद्यार्थिनींना हातावर मेंदी काढल्यामुळे वर्गात बसू न दिल्याच्या तक्रारीनंतर निर्माण झालेल्या वादाला नवी कलाटणी मिळाली. शिक्षण विभागाने मागवलेल्या लेखी खुलाशात शाळेने सर्व आरोप फेटाळले असून ही कारवाई शाळेच्या नियमानुसार सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीसाठीच करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण दिले. मात्र मनसेने शाळा प्रशासन लबाड असून शाळेचा खुलासा खोटा असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने यापुढे विद्यार्थिनींना अशी वागणूक देऊ नये यासाठी लेखी समज देणार असल्याचे शिक्षण विभागाने ‘लोकमत’ला सांगितले.
प्राचार्या बो. ओलिंडा फर्नांडिस यांनी केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, काही विद्यार्थिनींनी रजेच्या नोट्स, वैद्यकीय प्रमाणपत्र न आणल्यामुळे तसेच काही अपूर्ण गणवेशात होत्या. तसेच हातावर मेंदी असलेल्या विद्यार्थिनींना तात्पुरते ओपन हॉलमध्ये ठेवले होते. हे पाऊल आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उचलले असल्याचे सांगितले.
यापुढे शाळेबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये. तसेच शाळेतील विद्यार्थ्यीनींना कोणत्याही कारणास्तव वर्गाबाहेर ठेवणे किंवा शाळेत येण्यापासून रोखणे, असे प्रकार घडायला नको म्हणून लेखी समज दिली जाणार आहे.
-मुश्ताक शेख, शिक्षण निरीक्षक, उत्तर विभाग, चेंबूर
शाळेचे प्रशासन लबाडीने वागत आहे. मी घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. विद्यार्थिनींना ओपन हॉलमध्ये नव्हे; तर मोकळ्या जागेत फरशीवर बसविले होते. आम्ही त्यांना प्रेमाची समज दिल्यावर शाळा प्रशासनाने गयावया करत माफी मागितली. त्यावेळी प्राचार्य आणि इतर तीन महिला कर्मचारीही उपस्थित होत्या. पालकांची चूक नसतानाही त्यांना अन्याय सहन करावा लागला.
-कर्ण दुनबळे, सरचिटणीस, मनसे