चव्हाणांवर कारवाईची हॅट्रीक
By Admin | Updated: April 1, 2015 00:00 IST2015-04-01T00:00:50+5:302015-04-01T00:00:50+5:30
ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी रवी राव यांचे नाव प्रदेशने ‘फायनल’ केलेले असतांना व लिफाफाही घेऊन आलेल्या प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील

चव्हाणांवर कारवाईची हॅट्रीक
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी रवी राव यांचे नाव प्रदेशने ‘फायनल’ केलेले असतांना व लिफाफाही घेऊन आलेल्या प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांना म्हणजेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना न जुमानल्यानेच ठाणे महापालिकेचे गटनेते विक्रांत चव्हाण आणि शहर जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांची हकालपट्टी करण्यात आली. आतापर्यन्त चव्हाणांवर अशा प्रकारची ही तिसरी कारवाई ठरली. तर महापालिकेच्या निवडणूकीत एबी फॉर्मच्या घोटाळयानंतर पूर्णेकरांवर श्रेष्ठींनी प्रथमच कारवाई केली आहे.
महापालिकेत काँग्रेसच्या कोटयातून स्वीकृत सदस्य म्हणून रवि राव यांचे नाव निश्चित झालेले असतांना ऐनवेळी ते कट करण्यात आले. पाटील यांनी हे नाव देण्यापूर्वीच तिकडे प्रदीप राव यांच्या नावाची गटनेते चव्हाण यांनी घोषणाही केली. त्यामुळे ठाण्यातील कार्यकर्त्यांप्रमाणेच प्रदेश कार्यालयातही याचे पडसाद उमटले.
यातूनच मंगळवारी दिवसभरात झालेल्या हालचालींनंतर निरीक्षक म्हणून आलेल्या पाटील आणि शर्मा यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. नंतर, त्याबाबतचा अहवाल तातडीने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांना दिल्लीत पाठविला. हा अहवाल मिळाल्यानंतर पक्षशिस्त मोडणाऱ्या आणि प्रदेश कार्यकारिणीचा आदेश झुगारणाऱ्या पूर्णेकर आणि चव्हाण यांची हाकालपट्टी केल्याचे चव्हाण यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. प्रदीप राव यांचे नाव ऐनवेळी येण्यामागे पालिकेतच ‘अर्थ’कारण शिजल्याचीही चर्चा रंगली होती.