वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:30 IST2025-12-25T08:29:10+5:302025-12-25T08:30:07+5:30
CM Fadanvis on Raj And Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आनंद, मात्र राजकारणात फार काही घडणार नाही

वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी माणूस, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार.... हे स्क्रिप्ट अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे चालवत आहेत, त्यात काही तर बदल करा. मुंबईच्या विकासावर बोललात तर मी तुम्हाला एक हजार रुपये देईन, मागेही मी असेच आव्हान दिले होते; पण ते अजूनही विकासावर बोलत नाहीत, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, एकत्रित आले याचा मला आनंदच आहे; पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काही घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. दोन पक्ष निवडणुकीतील त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. त्यासाठी केलेली ही युती आहे. त्यापेक्षा अधिक काही अर्थ काढण्याचे कारण नाही. त्याने फार काही परिणाम होईल, असेही मला वाटत नाही.
मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे काम व पाप यांनी केलेले आहे ते पाहता मराठी माणूस त्यांच्यासोबत नाही. ज्या प्रकारे अमराठी माणसांवर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाहीत, असे ते म्हणाले.
यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचे, आता भावनिक बोलण्याला जनता भुलणार नाही. त्यांनी अजून दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीलाच पसंती देतील. महायुतीची विकासकामे बघून, मराठी माणसांना मुंबईतच घर देण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतील.
‘निवडणुकांवेळी त्यांना मराठी माणूस आठवतो’
निवडणुका आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो. मात्र, मुंबईकर सूज्ञ आहेत, त्यांना विकास हवा आहे. त्यांनी मुंबईच्या विकासावर एक शब्दही काढला नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जे स्वत:ची मुले सांभाळू शकत नाहीत ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार. ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला, त्यांनी मंगल कलशावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे, असेही शिंदे म्हणाले.
जे बोललो ते करुन दाखवले, असे ते म्हणाले. जे स्वत:ची मुले सांभाळू शकत नाहीत ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार, असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मुंबईतील रस्त्यांमध्ये, डांबरामध्ये, मिठी नदीतील गाळ, कोविडमध्ये ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस केला त्यांनी मंगल कलशावर बोलणे मोठा विनोदच, असे शिंदे म्हणाले.