मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:02 IST2024-12-10T09:02:39+5:302024-12-10T09:02:59+5:30

सत्ताधारी महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचे मानले जात असल्याने पालिका निवडणुकीबाबत हालचाली सुरू आहेत.

Chances of Sunil Rane as Mumbai BJP President; There is a lot of talk of replacing Ashish Shelar with a new face | मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये फेरबदलांना सुरूवात झाली आहे. या दृष्टीने भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नवा चेहरा देण्याबाबत पक्षात विचारविनिमय सुरू असून, माजी आ. सुनील राणे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. 

सत्ताधारी महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचे मानले जात असल्याने पालिका निवडणुकीबाबत हालचाली सुरू आहेत. विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली  आहे. 
मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागा मिळवण्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मेहनत आणि नीती महत्त्वाची मानली गेली होती. त्यामुळे यावेळीसुद्धा मुंबई अध्यक्ष म्हणून ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जावी, असा पक्षातील एका गटाचा आग्रह आहे.  

दुसरीकडे, माजी आमदार  सुनील राणे हे मुंबई अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. आमदारकीचे तिकीट न दिल्याने राणे यांच्याकडे सध्या मोठी जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्याची पक्षनेतृत्वाची इच्छा आहे. राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

मला पक्षाने कोणत्याही पदाची जबाबदारी दिली नाही तरी त्याला माझी कोणतीही हरकत असणार नाही. उलट जर मला जबाबदारीतून मुक्त केले तर अधिक प्रभावीपणे पक्षाचे काम करता येईल. त्यामुळे पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल आणि जबाबदारी सोपवेल, त्याला माझी हरकत असण्याचे कारण नाही. 
    - ॲड. आशिष शेलार, 
    मुंबई अध्यक्ष, भाजप 

मी आमदार नसल्याने माझ्याकडे कोणतीही मोठी जबाबदारी नाही. मुंबई अध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे, हे निश्चित पण अद्याप माझ्यापर्यंत अधिकृत काहीही आलेले नाही. पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली तर मला निश्चितच आनंद होईल. 
    - सुनील राणे, माजी आमदार

Web Title: Chances of Sunil Rane as Mumbai BJP President; There is a lot of talk of replacing Ashish Shelar with a new face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.