पूरग्रस्त भागात आव्हान पिण्याच्या पाण्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 06:34 AM2019-07-29T06:34:54+5:302019-07-29T06:34:58+5:30

रोगराई रोखण्यासाठी प्रयत्न हवेत : मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज घेण्याची गरज

Challenge drinking water in flood-hit areas | पूरग्रस्त भागात आव्हान पिण्याच्या पाण्याचे

पूरग्रस्त भागात आव्हान पिण्याच्या पाण्याचे

Next

मुंबई/ठाणे/बदलापूर : ठाणे जिल्ह्यात चार नद्यांना आलेल्या पुरामुळे बदलापूरला सर्वाधिक फटका बसला आहे. उल्हास नदीच्या पूररेषेअंतर्गत केलेली बांधकामे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या ठिकाणांत घातलेले मनमानी भराव, खारफुटीची तोड आणि यात बिल्डर, राजकारणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताचा फटका लाखो नागरिकांना भोगावा लागला.

कल्याण-अहमदनगर महामार्गावरील रायता गावाजवळ काळू नदीवर बांधलेल्या पुलाला लागून असलेला रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद असलेला हा राष्ट्रीय महामार्ग रविवारीही बंद ठेवण्यात आला होता. सायंकाळी तेथे दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आल्याचे महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील बचावकार्याकडेच शनिवारी दिवसभर प्रशासकीय यंत्रणांचे लक्ष असल्याने आणि त्याचाच गाजावाजा झाल्याने बदलापुरातील पुराकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसले.अनेक इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी असतानाही शासकीय यंत्रणा मदत आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. हेंद्रेपाडा, रमेशवाडी आणि वालिवली गाव परिसरात अनेक इमारती पाण्याखाली असताना शासकीय अधिकारी, कर्मचारी येथे फिरकलेही नाहीत. इमारतीतील नागरिकांनीच भर पावसात तळमजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील घरांतील साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम केले. काहींनी इमारतीच्या जिन्यात, तर काहींनी गच्चीच्या भागात आसरा घेतला. अनेकांना तेही शक्य न झाल्याने घरातील साहित्याचे, दुकानांतील वस्तुंचे मोठे नुकसान झाले. येथे सेवाभावी संस्था आणि राजकीय नेत्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. या नुकसानीचा अंदाज घेण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागात सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. तसेच पुरामुळे, कुजलेले अन्न टाकल्याने साथी पसरण्याचा धोकाही अधिक आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, तसेच वरप, कांबा, रायता आदी भागातील पाणीही रविवारी ओसरले. मुरबाडजवळील किशोर, तसेच वांगणीचा परिसर येथील पाणीही पूर्णत: कमी झाले.

बदलापूर आणि वांगणी या दोन रेल्वेस्थानकांच्या मध्ये ज्याठिकाणी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या भागात रुळाखालील खडी मोठ्या प्रमाणात वाहून गल्याने बदलापूर ते कर्जतदरम्यानची बंद पडलेली रेल्वे वाहतूक रविवारी रात्री हळूहळू सुरू झाली. सध्या त्या भागात सिग्नल दुरूस्ती सुरू आहे. रविवारी दिवसभर बदलापूर आणि वांगणीदरम्यान रेल्वेरुळाचे काम सुरू होते.
रविवारी सकाळपासून या मार्गावर खडी टाकण्याचे काम सुरू होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बदलापूर ते वांगणी रेल्वेमार्गाखालून वाहणाºया नाल्यांचीदेखील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. उल्हास नदीच्या पात्रातील पाणी थेट रेल्वेरुळांवर आल्याने या प्रवाहात मोठ्या प्रमाणात खडी वाहून गेल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. या मार्गावरील सिग्नल यंत्रणादेखील नादुरुस्त झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
अतिवृष्टीच्या इशारा रेल्वेने धुडकावला?
हवामान खात्याकडून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा होणार असल्याचा अंदाज आठवडाभर आधीच व्यक्त करण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकून प्रवाशांचा जीव धोक्यात आला असा आरोप करीत प्रवासी संघटनांनी या गोंधळाचे खापर रेल्वेवर फोडले. रेल्वेच्या अधिकाºयांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले. गाडी पुढे नेईपर्यंत रूळांवर पाणी नव्हते. नंतर पाणी दिसल्यावर गाडी थांबवण्यात आली असा दावा अधिकाºयांनी केला.
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडून कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा या भागाकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. पुराच्या काळात रेल्वेकडून तत्काळ उपाययोजना आवश्यक होती. मात्र रेल्वेने ती केली नसल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला.

पनवेलमध्ये एक बुडाला

च्पनवेल तालुक्यात गेल्या दोन दिवसात ५१० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. गाढी नदीचे पाणी परिसरात लोकवस्तीत शिरल्याने रहिवाशांना पनवेलमधील जामा मस्जिदमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले होते. पाणी ओसल्यावर कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला आदी ठिकाणी कचºयाचा खच जमा झाला होता. दरम्यान उसर्ली येथील शनिवारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह रविवारी आढळला.
च्दरम्यान, शनिवारी मासे पकडताना वाहून गेलेला यश म्हात्रे (१९) याचा मृतदेह रविवारी दुपारी अलिबाग येथील गणपतीपाडा थेरोंडा गावाजवळील समुद्रकिनारी सापडला.


नदीचे पाणी अचानक कसे वाढले?
शुक्रवारी रात्री पाऊस कोसळू लागल्यानंतर उल्हास नदीचे पाणी वाढू लागले. ते शहरात शिरत असूनही कोणत्याही यंत्रणेने त्याबाबत नागरिकांना सावध केले नाही. धोक्याचा इशाराही दिला नाही. १४ वर्षांपूर्वी महापुरावेळी ज्या पद्धतीने इशारा न देता दुर्लक्ष करण्यात आले, तशीच स्थिती यावेळीही होती. शनिवारी मध्यरात्री घरात पाणी शिरू लागल्यावर एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे नदीचे पाणी अचानक कसे वाढले, हाच प्रश्न नागरिक विचारत होते. पाणी वाढताच वीजपुरवठा बंद झाला. इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्या, पंप पाण्याखाली गेल्याने भोवताली पूर आणि पिण्यासाठीही पाणी नाही, अशी स्थिती दोन दिवस होती.

ती महालक्ष्मी दुरुस्तीसाठी मुंबईत
मुंबई : जी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीत प्रवाशांसह पुराच्या पाण्यात अडकली होती, तिच्या इंजिनात बिघाड झाल्याने शटल इंजिनने ती मुंबईत वाडीबंदर कारशेडमध्ये आणण्यात आली. तिच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.


रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारसह शनिवारी पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे महापुराची परिस्थीती निर्माण झाली होती. पुढील चार दिवस कोकणात जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, त्यामुळे जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये दोन हजार ३७२ मिमी म्हणजेच सरासरी १४८.२९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सातत्याने बरसणाºया पुराचे पाणी नदी काठच्या गावांमध्ये शिरले होते. त्याचा सर्वाधिक फटका अलिबाग, नागोठणे, महाड, रोहे, पनवेल या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

 

Web Title: Challenge drinking water in flood-hit areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.