मध्य रेल्वेचा ब्लेम गेम; पालिकेची ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी, मध्य रेल्वेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:26 IST2025-05-26T18:26:25+5:302025-05-26T18:26:49+5:30
महेश कोले मुंबई: मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले. दादर, शिव, कुर्ला, मस्जिद ...

मध्य रेल्वेचा ब्लेम गेम; पालिकेची ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी, मध्य रेल्वेचा दावा
महेश कोले
मुंबई: मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले. दादर, शिव, कुर्ला, मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान पाणी तुंबल्याने लोकलसेवा खोळंबली. दरम्यान मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( डीआरएम) यांच्या सोशल मीडिया वरून 'बीएमसी ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी मुंबईत सरासरी २५२ मिमी पावसाची नोंद झाली. तब्बल २४ वर्षांनंतर यंदा मे महिन्यातच मान्सूनचं आगमन झालं. मात्र, पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचं चित्र दिसून आलं. अनेक ठिकाणी रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रेल्वे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असली, तरी महापालिकेची पंपिंग स्टेशन वेळेत सुरु न झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा परिसरात मध्य रेल्वेकडून दोन पंपिंग स्टेशन स्थापन करण्यात आली होती. हे पाणी अनुक्रमे ओएनजीसी यलो गेट आणि महालक्ष्मीजवळ बाहेर सोडले जाते. मात्र, हे दोन्ही पंपिंग स्टेशन वेळेवर कार्यान्वित न झाल्यामुळे पाणी रुळांवर साचल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मी पंपिंग स्टेशन सकाळी ११.३० च्या सुमारास सुरु करण्यात आलं. त्याच वेळेस सकाळी ११:२४ वाजता ४.७५ मीटर भरतीची नोंद झाल्याने पूर दरवाजे जवळपास एक तास आधी बंद करावे लागले. त्यामुळे पाणी बाहेर जाण्यात अडथळा निर्माण झाला, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.