यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:37 PM2021-06-03T16:37:25+5:302021-06-03T16:37:53+5:30

संभाजीराजे ट्विट करत म्हणाले की, दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे.

Celebrate Shiv Rajyabhishek at home again this year, MP Chhatrapati Sambhaji Raje has appealed | यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन

यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन

Next

मुंबई: खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला होता. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असं आवाहन संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. पंरतु आज गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने समस्त शिवभक्तांनी रायगडवर न येता आपल्या घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. 

संभाजीराजे ट्विट करत म्हणाले की, दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. 

संभाजीराजे पुढे म्हणाले की, सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी. माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीत संभाजीराजे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश होते. त्यामुळे आता ६ जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी 2 जून रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Celebrate Shiv Rajyabhishek at home again this year, MP Chhatrapati Sambhaji Raje has appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.