Join us

सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:29 IST

Sushant Singh Rajput: या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे.

ठळक मुद्देसुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे.वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत. 'सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे, भाजपाचा आरोप

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडत भाजपा, सुशांत सिंग राजपूत कुटुंब, सीबीआय यांच्यावर भाष्य केले होत. त्यानंतर भाजपानेही शिवसेना आणि काँग्रेसवर पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे? असा सवाल केला आहे.

या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. भाजपा नेते म्हणाले की, सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यचं नव्हे तर या प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणात मौन सोडलं पाहिजे. वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत. सीबीआयने या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच 'सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून हे रहस्य समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनीच का राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मौन सोडावं असं निखील आनंद यांनी सांगितले आहे.

 काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले होते. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक  एफआयआर  दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.

काँग्रेस नेत्याचीही शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे, शिवसेना खासदार संजय राऊत सुशांत राजपूतच्या कुटुंबाबद्दल खुजी भाषा वापरत आहेत. प्रत्येक कुटुंबात काहीतरी कहाणी असते, शिवसेनेवाल्यांच्या तर अनेक आहेत. पण सुशांत सिंगचा मृत्यू हा एक संवेदनशील विषय आहे. शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसंजय राऊतआदित्य ठाकरेकेंद्रीय गुन्हे अन्वेषणभाजपा