स्तनाच्या कर्करोगावर केमाेथेरपीसाेबत कार्बोप्लॅटिनम औषधाने वाढते आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:40 IST2025-10-25T10:40:57+5:302025-10-25T10:40:57+5:30
टाटा रुग्णालयाचे महत्त्वाचे संशोधन ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्काॅलॉजी’मध्ये प्रसिद्ध

स्तनाच्या कर्करोगावर केमाेथेरपीसाेबत कार्बोप्लॅटिनम औषधाने वाढते आयुष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कर्करोगावर उपचारासाठी देशात प्रसिद्ध असणाऱ्या टाटा मेमोरियल सेंटरच्या डॉक्टरांनी स्तन कर्कराेगाच्या आजाराबाबत नवे संशोधन केले आहे. त्यामध्ये ट्रिपल - निगेटिव्ह कर्करोग झालेल्या रुग्णाच्या उपचार पद्धतीत केमोथेरपीसोबत ‘कार्बोप्लॅटिनम’ या औषधाचा वापर केल्यास रुग्णाचे आयुष्य वाढत असल्याचे दिसून आले. हे संशोधन जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्काॅलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
ट्रिपल - निगेटिव्ह हा स्तन कर्करोगाचा अत्यंत आक्रमक प्रकार आहे. यामध्ये हार्मोन किंवा प्रथिनांचे सामान्य मार्कर नसतात. यापूर्वीच्या छोट्या अभ्यासांमध्ये प्लॅटिनम - आधारित औषधांचा फायदा होतो, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याचा नियमित वापर करण्याकरिता ठोस असा पुरावा नव्हता. मात्र, या संशोधनामुळे जागतिक स्तरावरील हा वाद आता संपला आहे. ही जगातील पहिली मोठी आणि निर्णायक क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे.
१० वर्षांच्या महत्त्वाच्या चाचणीत ७२० महिलांचा समावेश
तिसऱ्या टप्प्यातील या औषधाच्या चाचणीसाठी २०१० ते २०२० मध्ये स्तन कर्करोग झालेल्या ७२० महिलांचा समावेश करण्यात आला. या सर्व रुग्णांची दोन भागांत विभागणी केली.
एका भागातील सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी प्रत्येक आठवड्याला एक असे आठ आठवडे पेंक्लिटॅक्सेल आणि त्यानंतर दर २१ दिवसांनी चारवेळा डॉक्सोर्युबिसीन व सायक्लोफॉस्फेमाइड याचा वापर करून केमोथेरपी दिली.
दुसऱ्या भागातील रुग्णांना या उपचाराबरोबरच आठवड्यातून एकदा कार्बोप्लॅटिनचे इंजेक्शन दिले. कार्बोप्लॅटिन हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि इतर कर्करोगांमध्ये नियमित वापरली जाणारी केमोथेरपी औषध आहे.
रोगमुक्त आयुष्य जगण्याचे प्रमाण वाढले
अभ्यासाचे मुख्य लेखक आणि टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले, सर्व रुग्णांना केमोथेरपीनंतर शस्त्रक्रिया व रेडिएशन देण्यात आले आणि त्यानंतर ६७ महिन्यांच्या फॉलोअपनंतर कार्बोप्लॅटिन दिलेले सुमारे ७४ टक्के रुग्ण पाच वर्षांनंतरही जिवंत होते, तर कार्बोप्लॅटिन न घेणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ६७ टक्के होते. म्हणजेच पाच वर्षांच्या रुग्ण जिवंत राहण्याचा दर हा ६६.८ टक्क्यावरून ७४.४ टक्क्यांपर्यंत सुधारल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात प्रत्येक १०० महिलांमधील सुमारे सात महिलांचे प्राण कार्बोप्लॅटिनमुळे वाचले. तसेच, रोगमुक्त आयुष्य जगण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवरून ७१ टक्क्यांपर्यंत वाढले. यावरून कार्बोप्लॅटिनमच्या वापरामुळे आयुष्य मर्यादा वाढण्याच्या प्रमाणात ७.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सिद्ध झाले. या संशोधनासाठी भारत सरकारच्या अणुउर्जा विभागाकडून निधी उपलब्ध करण्यात आले आहे.
तरुण महिलांना फायदा
विशेष म्हणजे, सर्वाधिक सुधारणा तरुण (रजोनिवृत्तीपूर्व) महिलांमध्ये आढळली. ५० वर्षांखालील महिलांमध्ये पाच वर्षांनंतर जिवंत राहण्याचे प्रमाण कार्बोप्लॅटिनमुळे ६६ टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत वाढले म्हणजेच ११ टक्के अधिक झाले. तसेच, या गटात रोगमुक्त राहण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांवरून ७४ टक्के झाले. उलट, ५० वर्षांवरील महिलांमध्ये हा लाभ मर्यादित होता.
...हे तर प्रेरणादायी
टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक आणि या अभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले, भारतासारख्या देशातील एका संस्थेने असा निर्णायक निष्कर्ष दिला, हे प्रेरणादायी आहे. यामुळे भारतात केलेले दर्जेदार संशोधन जगभरातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, हे या संशोधनाने दाखवून दिले आहे.