Camps Corner: Instructions to open the road immediately; Other repairs will take longer | केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी 

केम्प्स कॉर्नर : रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश; इतर डागडुजी, दुरुस्तीसाठी लागणार जास्त अवधी 

मुंबई : दक्षिण मुंबई परिसराने बुधवारी ४ तासांत तब्बल ३०० मिमी पाऊस आणि प्रतितास १०१ किमी वेगवान वा-याचा सामना केला. ही चक्रीवादळसदृश्य स्थिती होती. सुदैवाने संपूर्ण मुंबईत अशी स्थिती नव्हती. मात्र दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट, कुलाबासह डी विभाग क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ च्या प्रलयकारी पावसातही अशी स्थिती दक्षिण मुंबईने अनुभवली नव्हती, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले.

केम्प्स कॉर्नर येथील खचलेल्या भागाची इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. चहल म्हणाले, वाहतुकीसाठी रस्ता तातडीने खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षक भिंत आणि इतर डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी जास्त अवधी लागेल, असे ते म्हणाले. पावसाचा परिणाम म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आदींशी समन्वय साधून लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी यशस्वी प्रयत्न केले. पालिका प्रशासनाच्या यंत्रणेने अथक प्रयत्न करुन साचलेल्या पाण्याचा निचरा केला. बहुतांश भागांमध्ये पाणी पूर्णपणे ओसरले आहे. पावसानेही विश्रांती घेतल्याने विविध उपाययोजनांना वेग आला. गुरुवारी सकाळी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु झाली आहे. जे. जे. रुग्णालयात साचलेल्या पाण्याचा त्वरेने निचरा करण्याची कार्यवाहीदेखील पालिका प्रशासनाने केली. जोरदार पावसाच्या भाकिताच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्वच कोरोना आरोग्य रुग्णालये व समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सर्व ठिकाणी रुग्णांना योग्यरित्या उपचार मिळत आहेत.

-----------------------

४० ते ५० झाडे कोसळली

संरक्षक भिंत खचल्याने पाटकर मार्गावर निर्माण झालेला ढिगारा तसेच उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम महापालिका यंत्रणा, अग्निशमन दल आदींच्या समन्वयाने तातडीने सुरु करण्यात आले. केम्प्स कॉर्नर ठिकाणी भिंत खचून झालेला ढिगारा काढण्याचे काम वेगाने सुरु असून जवळपास ४० ते ५० झाडे कोसळली आहेत. संरक्षक भिंत आणि इतर डागडुजी, दुरुस्ती करण्यासाठी जास्त वेळ लागेल.

-----------------------

४ जलवाहिन्यांना हानी

संरक्षक भिंत खचल्याने त्याठिकाणाहून जाणा-या ४ जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल व रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता सदर बाधित भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येत आहे. सदर जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पर्यायी जलवाहिनी जोडून संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Camps Corner: Instructions to open the road immediately; Other repairs will take longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.