केक विषबाधा; दहिसरमधील ‘त्या’ दुकानदाराकडे पालिकेचा परवाना नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 05:30 IST2019-12-13T05:28:57+5:302019-12-13T05:30:04+5:30
दहिसर पश्चिम, कांदरपाडा येथील रहिवासी अर्जुन सिंग यांच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता.

केक विषबाधा; दहिसरमधील ‘त्या’ दुकानदाराकडे पालिकेचा परवाना नाही
मुंबई : दहिसर कांदरपाडा येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर २३ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणाच्या चौकशीत संबंधित केकशॉपकडे पालिकेचा परवाना नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अशा प्रकारे परवाना नसलेली अनेक दुकाने आणि हॉटेल्स मुंबईत राजरोस सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालिका महासभेत गुरुवारी करण्यात आली.
दहिसर पश्चिम, कांदरपाडा येथील रहिवासी अर्जुन सिंग यांच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. या वेळी केकमधून झालेल्या विषबाधाप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधि समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी गुरुवारी पालिका महासभेचे या घटनेकडे लक्ष वेधले.प्राथमिक चौकशीत केक खाल्ल्यानेच विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी पालिका अधिकारी आणि पोलिसांबरोबर त्या केकच्या दुकानाची पाहणी केली जेथून हा केक खरेदी करण्यात आला होता.
दुकानाच्या सखल चौकशीअंंती दुकान मालकाकडे अन्न व औषध प्रशासनाचे नोंदणी प्रमाणपत्र असल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याचवेळी दुकानदाराकडे आरोग्य विभागाचा परवाना नव्हता, ही बाब समोर आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या विषबाधाा प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रशासनाला दिले.
‘...तर ही घटना घडली नसती’
खाद्यपदार्थ विकणाºया दुकानांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. तसेच अग्निशमन दल व अन्य परवानगीही लागते. त्यापैकी एकही परवानगी त्या दुकानदाराकडे नव्हती. तरीही हे दुकान कसे सुरू होते, असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला.
या दुकानाला एका महिन्यापूर्वीच पालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस दिल्याचे सांगण्यात येते. त्याच वेळी दुकानावर कारवाई करून ते बंद केले असते, तर विषबाधेची घटना घडली नसती, असे मत पालिका महासभेत नगरसेवकांनी व्यक्त केले.