पितृपक्षापूर्वीच करा लिंबाची खरेदी; नाही तर जास्त पैसे मोजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:58 IST2025-09-01T15:57:34+5:302025-09-01T15:58:42+5:30
पितृपक्ष यंदा ७ सप्टेंबरपासून सुरू होत असून, तृतीया आणि चतुर्थी या तिथीचे श्राद्ध एकाच दिवशी केले जाणार आहे.

पितृपक्षापूर्वीच करा लिंबाची खरेदी; नाही तर जास्त पैसे मोजा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पितृपक्ष यंदा ७ सप्टेंबरपासून सुरू होत असून, तृतीया आणि चतुर्थी या तिथीचे श्राद्ध एकाच दिवशी केले जाणार आहे. दरम्यान, पितृपक्षात काही धार्मिक कार्यासाठी लिंबाचा वापरही केला जातो. त्यामुळे या काळात लिंबू महाग होण्याची शक्यता असते. परिणामी पितृपक्षाच्या अगोदर किंवा थोड्या दिवस आधीच त्याची खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.
आरोग्यासाठी वरदान, लिंबू आरोग्यासाठी लाभदायक आहे. नैसर्गिक व्हिटॅमिन 'सी' असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवितो. सर्दी-खोकल्यावर प्रभावी, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते. त्वचेसाठी गुणकारी. पचनसंस्थेला मदतही करते. उन्हाळ्यात कडाडले होते दर उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ होते. उत्पादनात घट झाल्याने एप्रिल ते जूनदरम्यान लिंबाचा दर २०० रुपये किलोपर्यंत विकला गेला.
खवय्यांमध्ये वाढतेय फ्रोजन लिंबाची क्रेझ
लिंबू फ्रीजरमध्ये ८ ते १० तासांसाठी ठेवत किसून त्याचा वापर करण्याची क्रेझ वाढत आहे. भाज्या, सॅलड, सूप, डाळी, नूडल्स, स्पगेटी, पास्ता, पिझ्झा, सॉस, भात, अशा विविध प्रकार पदार्थांवर लिंबू घालून खाल्ल्यावर चव वाढते. लिंबाच्या रसापेक्षा सालीमध्ये जास्त व्हिटॅमीन सी असते. ही आरोग्यवर्धक साल खाल्ल्यामुळे विषद्रव्ये बाहेर पडतात.
लिंब ४० रुपये किलो
सध्या लिंबाचा किरकोळ बाजारभाव ४० ते ५० रुपये प्रति किलो आहे, तर, तीन ते पाच नग लिंब दहा रुपयांना विकले जात आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पितृपक्षामध्ये का वाढेल लिंबांचा दर?
पितृपक्षात श्राद्धासाठी लिंबू आणि इतर पदार्थ जास्त प्रमाणात वापरले जातात, त्यामुळे मागणी वाढते. काही वेळा या काळात पुरवठा कमी होतो. परिणामी एका नगामागे १० ते २० रुपये मोजायला लागू शकतात. हंगामानुसार लिंबाची उपलब्धता कमी-जास्त होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पितृपक्षाच्या अगोदरच त्याची खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. १० - २९ रुपयांनाही एक नग लिंबू काही भागांत विकले गेले. पावसाळा, अधिक उत्पादन आणि कमी मागणी ही सध्याची दर गडगडण्यामागील कारणे आहेत. "मान्सूनपूर्व काळात लिंबाचे उत्पादन भरपूर झाले, मात्र लिंबाची मागणी घटली. ग्राहकांचा कल इतर फळांकडे वाढला", लिबाचे व्यापारी अमित बनियांनी सांगितले.