हार्बर मार्गावर पुन्हा गारेगार प्रवास! एसी लोकलच्या १४ सेवा; बघा काय आहे मध्य रेल्वेचे वेळापत्रक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:54 IST2026-01-24T17:52:02+5:302026-01-24T17:54:55+5:30
Harbour Line AC Train : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर बंद करण्यात आलेली एसी अर्थात वातानुकूलित रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारीपासून १४ फेऱ्या सुरू होणार आहेत.

हार्बर मार्गावर पुन्हा गारेगार प्रवास! एसी लोकलच्या १४ सेवा; बघा काय आहे मध्य रेल्वेचे वेळापत्रक?
Harbour Line AC Train Time Table: हार्बर मार्गावर सुरू करण्यात आलेली वातानुकूलित सेवा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ही सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. २६ जानेवारी म्हणजे सोमवारीपासून ही सेवा सुरू होत असून, मध्य रेल्वेने गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. सुरुवातीला दिवसभरात १४ फेऱ्या हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
नवी मुंबईला मुंबईशी जोडणाऱ्या हार्बर मार्गावर नव्याने एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. नवीन एसी लोकल रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान चालवल्या जाणार आहेत.
एसी लोकल ट्रेन सध्या सुरू असलेल्या विना वातानुकूलित लोकल रद्द करून चालवल्या जाणार आहेत. हार्बर लाईनवर १४ एसी लोकल सेवा सुरू होणार असल्याने मध्य रेल्वेच्या एकूण एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. मध्य रेल्वेकडून कल्याण मार्गावर ८० एसी लोकल सेवा सुरू आहेत. हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मागणी होत असल्याने ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे मध्ये रेल्वेने म्हटले आहे.
हार्बर लाईन एसी लोकल सेवा वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (अप)
वाशीवरून पहिली एसी लोकल पहाटे ४.१५ वाजता सुटणार. ४.४६ ला ही लोकल वडाळा रोड स्थानकात पोहोचेल.
पनवेलवरून सकाळी ६.१७ वाजता एसी लोकल सुटेल, ती ७.३६ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेवलवरून ९.०९ वाजता एसी लोकल सुटेल, ती १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेल स्थानकावरून १२.०३ वाजता एसी लोकल सुटेल, ती १३.०४ वाजता वडाळा रोडला पोहोचेल.
पनवेलवरून दुपारी १३.३१ वाजता एसी लोकल सुटेल, ती १५.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
पनवेलवरून दुपारी १६.५५ वाजता एसी लोकल सुटेल, ती १७.२६ वाजता वडाळा रोड स्थानकात पोहोचेल.
पनवेल स्थानकातून सायंकाळी १८.३७ वाजता एसी लोकल सुटेल, ती १९.५९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या एसी लोकलच्या वेळा (डाऊन)
वडाळा रोड स्थानकातून पहाटे ५.०६ वाजता एसी लोकल सुटेल, ती ६.०८ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी ७.४० वाजता एसी लोकल सुटेल, ती ९ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून १०.३४ ला सुटलेली एसी लोकल ११.५४ वाजता पनवेल स्थानकामध्ये पोहोचेल.
वडाळा रोड स्थानकातून १३.१७ वाजता सुटणारी एसी लोकल पनवेल स्थानकात १४.२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५.५४ वाजता सुटणारी एसी लोकल १६.४३ वाजता वाशी स्थानकामध्ये पोहोचेल.
वडाळा रोड येथून १७.३० वाजता सुटणारी एसी लोकल पनवेल स्थानकात १८.३२ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून रात्री २०.०० म्हणजे आठ वाजता सुटणारी एसी लोकल २१.२१ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.