बसची कारला धडक; महिला चिरडली, 'सह्याद्री अतिथीगृह' समोरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 07:38 IST2025-08-13T07:38:23+5:302025-08-13T07:38:38+5:30
भाडेतत्त्वावरील बेस्ट चालकांच्या प्रशिक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह

बसची कारला धडक; महिला चिरडली, 'सह्याद्री अतिथीगृह' समोरील प्रकार
मुंबई : दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर मंगळवारी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या कारला धडक दिली. त्यावेळी बस आणि कारमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला निता शहा ही स्थानिक रहिवासी असून मॉर्निंग वॉकसाठी तेथे आली होती. या घटनेमुळे भाडेतत्त्वावरील बेस्ट बसचालकांच्या प्रशिक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मंगळवारी सकाळी बेस्टची १०५ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस विजय वल्लभचौकाकडून कमला नेहरू पार्ककडे जात असताना सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी बस आल्यावर अचानक मोठा आवाज झाल्याने बसचालक बसमधून उतरला. तेव्हा या महिलेला डोक्याला मार लागला असून डाव्या बाजूला असलेल्या पार्किंग केलेल्या गाडीचेही नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात बसचा अपघात
मागच्या वर्षी झालेल्या कुर्ला अपघातानंतरही बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बस अपघातांची मालिका थांबलेली नाही. मागील महिन्यातील वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीच्या भाडेतत्त्वावरील बस अपघातासह अनेक अपघातांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाडेतत्त्वावरील बसचा दर्जा आणि त्यावरील चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वर्ष २०२२ पासून ते डिसेंबर २०२४ पर्यंत भाडेतत्त्वावरील बसचे एकूण ११४ अपघात झाले असून, यातील ४० गंभीर आहेत.
इव्ही ट्रान्स कंपनीची 'ती' अपघाग्रस्त बस
बस आणि कारमध्ये चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. पोलिसांनी अपघातानंतर तत्काळ स्वतःच्या मोबाइल व्हॅनमधून महिलेला जे.जे. रुग्णालयात नेले.
मृत महिलेचे नाव निता शहा असून त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंगमध्ये राहतात. मात्र, तेथील उपस्थित डॉक्टर स्नेहल जाधव यांनी महिलेला मृत घोषित केले. ही इलेक्ट्रिक बस इव्ही ट्रान्स कंपनीची भाडेतत्त्वावरील असून याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.