चालकामुळे १७ प्रवासी बचावले; सायन-पनवेल महामार्गावर बस पेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:55 AM2023-02-17T10:55:58+5:302023-02-17T10:56:26+5:30
सांगोल्याहून साताऱ्याला जाणाऱ्या एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस सायन पनवेल महामार्गावरून जात असताना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबवून १७ प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
सांगोल्याहून साताऱ्याला जाणाऱ्या एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस सायन पनवेल महामार्गावरून जात असताना इंजिनमधून ठिणग्या पडू लागल्या. बसचालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबवून प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधून बाहेर जायला सांगितले. इतक्यात बसने पेट घेतला. मात्र, प्रवासी उतरल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.