लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:55 IST2025-11-05T06:54:59+5:302025-11-05T06:55:40+5:30
सध्या बीएसएनएलचे १२५ टॉवर कार्यरत

लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बीएसएनएलनेमुंबईत दूरसंचार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या तयारीला वेग आला आहे. येत्या २० ते २५ दिवसांत ही सेवा सुरू होणार असून, त्यासाठी २ हजार टॉवर उभारण्यात येणार आहेत. सध्या बीएसएनएलचे १२५ टॉवर कार्यरत असून, उर्वरित टॉवर उभारण्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. सध्या खासगी कंपनीसोबत इंट्रा सर्कल रोमिंगचा करार करण्यात आला असून, त्याद्वारे सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती बीएसएनएलचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार यांनी दिली.
सध्या विविध तांत्रिक परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. डीओटी टेस्टिंग झाल्यावर ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल व एमटीएनएलच्या विद्यमान ग्राहकांना बीएसएनएलच्या सेवेत सामावून घेतले जाईल, असे हरिंदर कुमार यांनी स्पष्ट केले.
तब्बल पाच लाख सीम विक्रीचे ध्येय समोर
या सेवेसाठी सीम विक्रीला मर्यादित प्रमाणात प्रारंभ करण्यात आला असून, लवकरच पूर्ण क्षमतेने सीम विक्री केली जाईल. याचे सॉफ्ट लाँच झाले असून, मुंबईत किमान ५ लाख सीम विक्रीचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. बेरोजगार तरुणांना सीम विक्री करण्यासाठी भागीदार म्हणून संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
धोरणात्मक भागीदारी
मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन ३ मध्ये टेलिकॉम सेवा (इन-बिल्डिंग सोल्यूशन्स) बीएसएनएल पुरवणार आहे. याबाबत बीएसएनएलने एका कंपनीसोबत करार केला आहे.
यासाठी प्रणाली विकसित करण्याचे काम येत्या १५ ते २० दिवसांत होई. ही धोरणात्मक भागीदारी मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये दूरसंचार सेवा सक्षम करून चांगली सुविधा पुरवेल, असा विश्वास महाव्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.
अडीच हजार ठिकाणी सेवा
- ग्राहक - ५२ लाख
- सक्रिय ग्राहक - ४० लाख
- दरमहा रिचार्ज करणारे ग्राहक - ३२ लाख
- दुर्गम भागातील दूरसंचार सेवेपासून वंचित राहिलेल्या २५०० ठिकाणी बीएसएनएलची सेवा सुरू होणार, २२०० ठिकाणी सेवेला प्रारंभ करण्यात आहे.