Join us

दि म्युनिसिपल बँकेबाहेरील दलाल झाले गायब; शाखांनी केले सिक्रेट मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 05:49 IST

कामकाजानंतरच्या बैठका थंडावल्या

मुंबई : दि म्युनिसिपल बँकेच्या मुलुंड शाखेतील आर्थिक घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मुंबईतील विविध शाखांभोवती तळ ठोकून असलेले दलाल गायब झाले आहेत. तर, काहींनी चक्क सिक्रेट मार्ग बंद केल्याचे दिसून आले.

दि म्युनिसिपल बँकेच्या मुंबईत २२ शाखा असून त्यात ८४ हजार खाती आहेत. मुलुंडच्या शाखेत लिपिकाने कार्यालयीन कामकाजानंतर संगणक प्रणालीचा गैरवापर करीत साडेतीन कोटींचा घोटाळा केला. अशाच प्रकारे मुंबईतील विविध शाखांमध्ये कार्यालयीन कामकाजानंतर व्यवहार सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली. त्यात, काही ठिकाणी दलालांना हाताशी धरूनही कर्ज मंजुरीसह विविध व्यवहार होतात.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कार्यालयीन कामकाजानंतर दलालासोबत चालणाऱ्या बैठका थंडावल्याचे बँकांमधीलच काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवाय, काही शाखांबाहेरील सिक्रेट मार्गही बंद करण्यात आले आहेत. अनेकदा १० टक्के कमिशनवर काम चालत असल्याची माहितीही समोर येत आहे.

कर्मचाऱ्यांनी घेतली महाव्यवस्थापकांची भेट

कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी महाव्यवस्थापक प्रमोद रावदका यांची भेट घेत या घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करीत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली. शिवाय, अन्य शाखांमधीलही घोटाळ्याबाबत तपासणी करण्याची मागणी केली.

टॅग्स :बँकपोलिसअटकगुन्हेगारीमहाराष्ट्रमुंबई