MNS Raj Thackeray: यंदाचा मराठी भाषा गौरव दिन राज ठाकरे यांच्या मनसेकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्ताने दादरमधील छत्रपती शिवाजी मैदान इथं विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मनसेकडून २७ फेब्रुवारी ते २ मार्च असे चार दिवस पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्वत: राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे. या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या," असं आवाहन राज यांनी केलं आहे.
"मी वाट पाहतोय..."
राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमधून पुस्तक प्रदर्शनामागील हेतूही स्पष्ट केलं आहे. "आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढ्यांना कळायलाच हवं आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही. मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरू आहे, पण मराठी ही आता ज्ञानाची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय...," असं राज ठाकरे म्हणाले.