Join us  

ब्रेकिंग: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली शरद पवारांशी 'फोन पे चर्चा'; सत्तास्थापनेला आला वेग 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 12:24 PM

राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत अनेकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याबाबत या दोन्ही नेत्यांची फोनवरुन चर्चा झाली. 

राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत अनेकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून राहिल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. राज्यात ९ नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होणार आहे. त्यापूर्वी नवीन सरकार येणं गरजेचे आहे अन्यथा राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु होईल. मात्र राष्ट्रपती राजवटीचं षडयंत्र कोणी रचत असेल तर ते महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. 

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर दिल्लीतही पडद्यामागून अनेक घडामोडी दिसताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी भाजपाचे नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं. त्याचसोबत मुंबईतही शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शिवसेनेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असली तरी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील या सत्ता स्थापनेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. तसेच राज्यातील काँग्रेस आमदारांचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते अनुकूल आहेत. काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, राज्यातील ओला दुष्काळ याबाबत मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बोलविण्यात आलं आहे. मात्र शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांना याचं निमंत्रण नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उपस्थित नाहीत. शिवसेना-भाजपात यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन तिढा कायम आहे. मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजपा तयार नाही तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं शिवसेना नेते ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन नेमकी काय चर्चा झाली हे आगामी काळातच स्पष्ट होईल.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपामुख्यमंत्री