नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:32 IST2026-01-01T15:24:51+5:302026-01-01T15:32:23+5:30
माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी एक पोस्ट करत देवाचे आभार मानले आहे.

नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
भाजपाने मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक १०७ मधून किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्यांना उमेदवारी दिली आहे. मुलुंडमधील या वार्डामधून मनसे-उद्धवसेना, काँग्रेस या पक्षांचा उमेदवार नसल्याचे आता समोर आले आहे. सोमय्या यांनी स्वतः एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. देव महान आहे, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. पण, त्यापूर्वीच नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "नील सोमय्या यांच्या मुलुंडमधील वार्ड क्रमांक १०७ मधून उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे शरद पवारांची राष्ट्रवादी, राहुल गांधींची काँग्रेस यांनी उमेदवारच दिला नाहीये. देव महान आहे."
उद्धवसेना-मनसेने खरंच उमेदवार दिला नाही का?
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे एकत्र उतरली आहे. तर उद्धवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) काही जागा दिल्या आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धवसेनेची युतीच आहे.
नील सोमय्या निवडणूक लढवत असलेल्या वार्ड क्रमांक १०७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडले नसल्याची त्रुटी आढळून आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला.
त्यामुळे नील सोमय्या यांच्याविरोधातील महाविकास आघाडीचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू अपक्षांपैकी कुणाला पाठिंबा जाहीर करणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.