Join us  

दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर; जागावाटपावर अंतिम चर्चा, लवकरच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:30 PM

महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना किती जागा मिळतील, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे

मुंबई - भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून ते उमेदवार प्रचाराच्या मैदानातही उतरले आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या काही उमदेवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी आणि महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यातच, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या वर्षा बंगल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचले असून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच, आजच महायुतीतील जागावाटपाची घोषणा होऊ शकते. 

महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना किती जागा मिळतील, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने दोन्ही पक्षांना जागावाटपात कमी जागा मिळत असल्याचे सांगून हिनवले जात आहे. मात्र, अद्यापही जागावाटप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्याकडून नेमकं कोणत्या नावांची घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर बैठक सुरू असून या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते. तसेच, आजच महायुतीतील जागावाटप आणि काही उमेदवारांच्या नावाची घोषणाही होण्याची शक्यता आहे. 

भाजपने महाराष्ट्रातील २० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण, अजुनही २८ जागांचा गुंता सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी ७ जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार सात जागांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महादेव जानकरांनाही भाजपाने एक जागा देऊ केली आहे. तसेच, मनसेसोबतही महायुतीची चर्चा सुरू असून त्यांनाही एक जागा देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. मात्र, आज बैठकांचा धडाका लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, महायुतीकडून आज काही नावांची घोषणा होऊ शकते. 

महादेव जानकरांचा यु-टर्न

महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत,'' असं महादेव जानकर यांनी बैठकीत सांगितलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेभाजपादेवेंद्र फडणवीसअजित पवारलोकसभा निवडणूक २०२४