बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:29 IST2025-07-11T22:29:32+5:302025-07-11T22:29:49+5:30
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते.

बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन
मुंबई-बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना जलमार्गाने सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता परंतू, या रो-रो जेट्टीमुळे हा प्रवास वेळ केवळ पंधरा मिनिटांत पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच या जेट्टीचे काम वेळेत पूर्ण करून ही रो-रो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल अशी ग्वाही देखिल त्यांनी दिली.
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते.
बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसेच स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी बोरिवली फेज १ रो-रो जेट्टी सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जशी मुंबई मध्ये मेट्रो सेवा आहे, त्याचप्रमाणे मुंबईच्या एमएमआर भागात वॉटर मेट्रो सेवा देखील सुरु व्हावी असा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम सुरु केले आहे. त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपल्या महायुती सरकारची असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.