"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:52 IST2026-01-09T17:50:42+5:302026-01-09T17:52:12+5:30
मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे असं उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.

"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
मुंबई- आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्यात मुंबई वाचवायची आहे, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे असा प्रचार ठाकरे बंधू यांच्या युतीकडून केला जात आहे. त्यातच भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे पक्षाची कोंडी होत असल्याचं दिसून येते. मुंबईतील निवडणुकीसाठी भाजपाने उत्तर प्रदेश, बिहार यासह इतर राज्यातील नेत्यांना प्रचारात आणून अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तामिळनाडूतील भाजपाचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईतील वार्ड क्रमांक ४७ येथे प्रचार केला. त्यावेळी त्यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान केले आहे.
भाजपा नेते के. अण्णामलाई या मुलाखतीत म्हणतात की, इथल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे. जर तुम्ही चेन्नई पाहिले तिथे डिएमके आहे आणि टॉपला भाजपा, बंगळुरू काँग्रेस, भाजपा आणि हैदराबाद येथेही काँग्रेस भाजपा असं आहे. मात्र देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी आहे ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट ८ हजार कोटी आहे. बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील असं त्यांनी म्हटलं.
मात्र भाजपा नेते अण्णामलाई यांच्या विधानावरून उद्धवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी त्यांना सुनावले आहे. शेवटी पोटातलं ओठांवर आलंच...भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका...पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या..शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही आणि मुंबई महाराष्ट्राचीच असं चित्रे यांनी बजावून सांगितले.
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका... पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर… pic.twitter.com/EVp9SA8QhM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 9, 2026
भिवंडीत मनसेनं बॉम्बे नावाचा फलक फोडला
दरम्यान, प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी भेटी देत आहेत. गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला "बॉम्बे ढाब्या" वर गेली. जेथे अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ढाबा व्यवस्थापकास हे नाव तात्काळ बदलण्यास सांगितले त्याशिवाय इथला नामफलकही मनसेने फोडला.