Join us

तुनीषाच्या आत्महत्येने बॉलिवूडला धक्का; अनेकांनी केले कलागुणांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 05:36 IST

एवढ्या तरुण प्रतिभेच्या निधनाची बातमी क्लेशदायक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘फितूर’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि छोट्या पडद्यावरील अभिनेता करण कुंद्रा यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री तुनिषा हिने शनिवारी येथील वसई परिसरात अली बाबा : दास्तान-ए-काबुल या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती.

अभिषेक कपूर यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुनिषा शर्माच्या निधनाने धक्का बसला आणि दु:ख झाले. ती १३ वर्षांची असताना मी तिच्यासोबत ‘फितूर’मध्ये काम केले होते. ती अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय अभिनेत्री होती. करण कुंद्रा  यांनी ट्विट केले की, धक्कादायक आणि अत्यंत दु:खद घटना आहे. युवा कलाकार आणि तरुण अभिनेत्री आपल्यातून निघून गेली आहे. या दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती तिच्या कुटुंबीयांना मिळावी. चित्रपट निर्माते मुकेश छाबरा यांनीही ट्विट केले की, यावर विश्वास बसत नाही. तुनिषा शर्मा यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो.

कुटुंबीयांचे सांत्वन करणारे ट्वीट्स  

निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट केले की, आयुष्यातील कोणतेही दु:ख इतके मोठे असू शकत नाही की, त्यावर मात करता येत नाही. रश्मी देसाई, करणवीर बोहरा आणि सुगंधा एस मिश्रा या छोट्या पडद्यावरील कलाकारांनी शर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रश्मी देसाई यांनी म्हटले आहे की, मी तिला कधीच भेटले नाही, पण तिला ओळखत होते. तिच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो. करणवीर बोहरा यांनी ट्विट केले की, हे अत्यंत दु:खद आहे.  तुनिषा शर्मा यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. सुगंधा एस. मिश्रा यांनी म्हटले आहे की, एवढ्या तरुण प्रतिभेच्या निधनाची बातमी क्लेशदायक आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजन