पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात..! महापालिकेसह मुंबईकरांची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:42 IST2025-05-27T12:41:44+5:302025-05-27T12:42:20+5:30
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टचे मार्ग वळविले

पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात..! महापालिकेसह मुंबईकरांची पळापळ
मुंबई : पावसाने यंदा लवकर लावलेल्या हजेरीमुळे पालिकेचे नियोजन कोलमडले. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईत काही ठिकणी जवळपास २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतील दादर टी.टी., हिंदमाता, जे.जे. मांडवी पोस्ट ऑफिस, कुरणे चौक, सायन येथील मंचरजी जोशी मार्ग साचल्याने स्थानिकांसह नोकरदारांचे हाल झाले.
सोमवारी पडलेल्या पावसामुळे हिंदमाता परिसर, गांधी मार्केटमध्ये पाणी साचल्याने लोकांचे हाल झाले. तसेच ग्रॅण्ट रोड येथील नाना चौक परिसर, मुंबई सेंट्रल, बोरिवलीतील देवीपाडा सब-वे, पेडर रोड, कफ परेड, प्रभादेवी रेल्वेस्थानक अशा प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे मोठे हाल झाले हाेते. तसेच वरळी नाका, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, जे.जे. मार्ग, किंग सर्कल, वाकोला रामनगर सब-वे येथेही सखल भागांत वाहतूककोंडी झाली. तसेच पाणी साचल्याने बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले. यात गांधी मार्केट येथे पाणी भरल्याने दोन्ही दिशांतील बसगाड्या भाऊ दाजी मार्गाने परावर्तित केल्या. सायन रोड नंबर २४ वर पाणी भरल्यामुळे मार्ग क्रमांक ३४१ व ३१२ वरील बस सायन मेन रोडचा सिग्नल येथून मार्गस्थ करण्यात आल्या. वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने मार्ग क्रमांक ११७ व १७४ च्या बस नऊ वाजल्यापासून वडाळा चर्चमार्गे परावर्तित केल्याचे प्रशासनाने सांगितले.
पाणी साचण्याची नवीन ठिकाणे; प्रशासनाकडून उपायोजना सुरू
शहरातील काही भागांत यंदा नव्याने पाणी साचण्याची ठिकाणे तयार झाल्याची माहितीही पुढे आली आहे. मंत्रालय, चर्चगेट, मेट्रो सिनेमा येथेही नवीन पूरप्रवण क्षेत्रे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विभागीय वॉर्ड अधिकारी आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागांना या ठिकाणी पाणी का साचत आहे, याची माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दीर्घकालीन उपाययोजना मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचण्याची नवीन ठिकाणे तयार होतात. तेथे प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर त्यावर तत्काळ किंवा दीर्घ उपाययोजना कराव्या लागतात, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
४५ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी
पावसामुळे शहरात २४ व पश्चिम उपनगरात ०१ अशा एकूण २५ ठिकाणी शॉटसर्किट झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या. माहीमच्या कॅडल रोडवरील जहांगीर बाग चाळ येथील हाजी कासम इमारत या म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली.
या इमारतीत अडकलेल्या दोन स्थानिकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. तर शहरात ३४, पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण ४५ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत.
सेंट झेवियर्स महाविद्यालय येथे झाडाची फांदी पडून साईराज पवार (२४) हा तरुण जखमी झाला असून त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
अंधेरीत संरक्षक भिंत कोसळली
पावसामुळे अंधेरी पश्चिमेतील व्हीपी रोड येथील काका पाटील चाळीची संरक्षक भिंत सोमवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
काका पाटील चाळीशेजारी विकासकाने खोदकाम केल्याने ही भिंत कमकुवत होऊन कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पश्चिमेतील उद्धव सेनेचे उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, शाखाप्रमुख उदय महाले आणि शिवसैनिक प्रशांत सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना दिलासा दिला.
पालिकेच्या आपत्कालीन विभागाला पाचारण करून सुरक्षा उपाययोजना करून घेतल्या. त्याचबरोबर विकासकाला संरक्षक भिंत उभारण्याची ताकीद दिल्याची माहिती आयरे यांनी दिली.
कार्यक्षेत्रात उपस्थित राहा
पावसामुळे सोमवारी सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर, सर्व वॉर्ड ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे. याची उपायुक्तांनी खातरजमा करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सर्व यंत्रणा सतर्क झाली असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेचे सहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी उपस्थित असून घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सर्व विभागप्रमुख, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथकांना प्रत्यक्ष मैदानात तैनात करण्यात आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
नियंत्रण कक्ष सज्ज
पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज आहे. या नियंत्रण कक्षाला नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी तत्काळ नोंदवून संबंधित विभागांना त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पाठवण्यात येत आहेत. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत.
तरंगत्या कचऱ्यावर विशेष लक्ष
घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत. पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा, तरंगता घनकचरा मॅनहोल किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कर्मचारी ठिकठिकाणी सेवा बजावत आहेत, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
हेल्पलाइनवर संपर्क साधा
संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल कार्यरत असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यकता नागरिकांनी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.