उच्चभ्रू वस्तीत 'नोटा'ला मिळाली सर्वाधिक पसंती; मागासलेल्या भागातील मतदारांकडून कमी प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 05:59 IST2026-01-19T05:58:37+5:302026-01-19T05:59:34+5:30
मुलुंड येथील प्रभाग १०७ या प्रभागातदेखील १,१७९ मतदारांनी 'नोटा'ला आपले मत दिले

उच्चभ्रू वस्तीत 'नोटा'ला मिळाली सर्वाधिक पसंती; मागासलेल्या भागातील मतदारांकडून कमी प्रतिसाद
मुंबई : मुंबईतील २२७ प्रभागांपैकी 'नोटा'ला सर्वाधिक पसंती सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुलाबा प्रभागात मिळाली आहे, तर सगळ्यात कमी नोटाचे मतदान शिवाजीनगर, मानखुर्द, शिवाजीनगर गोवंडी, कुर्ला पश्चिम यासारख्या मागास समजल्या जाणाऱ्या भागात झाले.
कुलाब्यातील प्रभाग क्रमांक २२६ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर विरुद्ध अपक्ष तेजल पवार यांची थेट लढत झाली. यात नार्वेकर यांचा विजय झाला. मात्र, 'नोटा' म्हणजेच 'वरील उमेदवारांपैकी कुणालाही नाही' हा पर्याय तब्बल १,४०४ मतदारांनी निवडला. कदाचित या प्रभागात मतदारांना पर्याय म्हणून तिसरा उमेदवारच नसल्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुलुंड येथील प्रभाग १०७ या प्रभागातदेखील १,१७९ मतदारांनी 'नोटा'ला आपले मत दिले. या ठिकाणी ७उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजपकडून माजी खा. किरीट सोमैया यांचे पुत्र नील सोमैया निवडणूक रिंगणात होते. सोमैया यांची लढत अपक्ष दिनेश जाधव यांच्याशी झाली आणि तिसऱ्या क्रमांकाची मते 'नोटा'ला मिळाली. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून या प्रभागात उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. २०१७ मधील महापालिका निवडणुकीत वांद्रे पूर्वेकडील एका प्रभागात १,१३५ इतके सर्वाधिक मतदान 'नोटा'ला झाले होते.
दादर, गिरगाव परिसरात मतदानाचा ट्रेण्ड कोणता ?
गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही 'नोटा'ला सगळ्यात कमी पसंती केवळ ७६ मते, गोवंडी-शिवाजीनगर येथील १३४ या प्रभागात झाले असून, २०१७ च्या निवडणुकीत याच प्रभागात सर्वाधिक कमी ४७ झाले होते.
मानखुर्द, गोवंडी, कुर्ला पश्चिम या मागास समजल्या जाणाऱ्या बहुतांशी प्रभागात २०० पेक्षा कमी मतदान हे 'नोटा'ला झाले असल्याचे निकालांवरून दिसून येत आहे. दादर, गिरगाव यासारख्या मराठीबहुल मध्यमवर्गीय भागात साधारण ३००-६०० या प्रमाणात 'नोटा'ला मतदान झाले आहे.
'नोटा'ला सर्वाधिक पसंती मिळालेले तीन प्रभाग
प्रभाग क्रमांक: २२६
१,४०४
प्रभाग क्रमांक :१७९
१०७१
प्रभाग क्रमांक: ४६
९८०