"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 23:18 IST2026-01-12T23:00:11+5:302026-01-12T23:18:15+5:30
BMC Elections 2026 : महायुतीची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरें बंधूंवर निशाणा साधला.

"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
BMC Elections 2026 : "मराठी माणूस खतरे में है म्हणता, मग ३० वर्ष तुम्ही काय गोट्या खेळल्या का? २५ ते ३० वर्ष सत्ता राबवली. तरीही मराठी माणसाची ही अवस्था असेल तर चुल्लूभर पाणी में डुब मरो. आदित्य ठाकरेंनी उद्या दिवस भरात कधीही सांगावं या आमच्याकडून शीतल गंभीर येतील. करूया चर्चा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. आज (सोमवारी) शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई नाही. तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही जनता आहे. मराठी म्हणजे ही जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे ही जनता आहे. आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला आवडतं, मला प्रॉब्लेम नाही. त्यांना समजायला पाहिजे, नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली? काकांना किमान चांगली नक्कल तरी करता येते, भाषण करता येते. तुमची काय अवस्था होईल ते पाहा, असा टोलाही फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
"काय सांगतात तर ही शेवटची निवडणूक आहे. मुंबईकरांसाठी ही शेवटची निवडणूक नाही, मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक नाही, आम्ही पानीपतमध्ये लढणारे आहोत. आम्ही शौर्य गाजवणारे माणसे आहोत, असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"
"महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगात नेला. कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे. पण माझ्यासाठी तो संवाद असतो. काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावे लागतो. मी त्यांच्याच शब्दात सांगतो, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ लावला. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे दाखवले तर कधी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे दाखवले.