मुंबई- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा शिंदेसेनेच्या महायुतीतून सन्मानजनक जागा न मिळाल्याने आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले नाराज होते. मुंबईत जवळपास ३० हून अधिक ठिकाणी आरपीआयने उमेदवार उभे केले होते. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या जागा भाजपा आणि शिंदेसेना आपापल्या कोट्यातून सोडणार असल्याची माहिती आरपीआयच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि प्रविण दरेकर यांना निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातीलही काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने १७ जागांची अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. त्यातील किमान १२ जागा आरपीआयला सोडण्यात येणार आहेत. अन्य जागांवर रिपब्लिकन पक्षांची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तसेच मुंबई मनपाच्या उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपा शिंदेसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्षा बंगल्याबाहेर पत्रकारांना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यासह इतर नेते उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नसल्यामुळे रिपब्लिकन पक्ष नाराज होता. या नाराजीतुन रिपब्लिकन पक्षाच्या ३० उमेदवारांनी स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. ३० जागांवर आरपीआय उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत आहेत. त्यातील १७ जागांची अंतिम यादी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. त्यातील भाजपाच्या कोटयातील ६ ते ७ जागा सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिली असून तसे निर्देश त्यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रविण दरेकर यांना दिले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोटयातीलही रिपब्लिकन पक्षाला हव्या असणाऱ्या ६-७ जागा सोडण्यात येणार आहेत. त्याविषयी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे. उर्वरित १८ जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणुक लढणार आहे. भाजपा शिवसेना कोटयातून ६-६ अशा १२ जागा आरपीआयला सोडण्यात येतील. त्या १२ जागांवरील भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील आणि आरपीआय उमेदवाराला पाठिंबा देतील असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले. रिपब्लिकन पक्षाला १ विधानपरिषद सदस्य, २ महामंडळाचे अध्यक्ष, ५०-६० महामंडळाचे सदस्य तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये २ स्वीकृत सदस्य देण्यात यावेत अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाचे समाधान झाले असून महापालिकेत झालेली नाराजी दूर झालेली आहे. आरपीआय महायुतीचा प्रचार करेल असंही आठवले यांनी सांगितले आहे.
Web Summary : Following Ramdas Athawale's discontent over seat allocation, BJP and Shiv Sena will concede 12 seats to RPI in the Mumbai municipal elections. Athawale met Fadnavis, submitting a list of 17 desired seats. RPI will support the alliance on remaining seats.
Web Summary : रामदास आठवले की सीट आवंटन पर असंतोष के बाद, भाजपा और शिवसेना मुंबई नगर निगम चुनावों में आरपीआई को 12 सीटें देंगी। आठवले ने फडणवीस से मुलाकात की, जिसमें 17 वांछित सीटों की सूची सौंपी गई। आरपीआई शेष सीटों पर गठबंधन का समर्थन करेगी।