मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:27 IST2026-01-15T10:26:14+5:302026-01-15T10:27:04+5:30
Municipal Election voting news 2026: मुंबई मनपा निवडणुकीत दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये दुबार मतदार आढळल्याने गोंधळ. मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनावर साधला निशाणा. वाचा सविस्तर.

मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी आज सकाळपासूनच उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्या काही तासांतच दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये 'दुबार मतदार' आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्यासमोरच हा मतदार सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "दुबार मतदार दिसला तर त्याला तिथेच फोडून टाका," असे आक्रमक आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते सतर्क असताना, वॉर्ड १९२ मध्ये एक महिला मतदार दुबार यादीत असल्याचे समोर आले. यशवंत किल्लेदार स्वतः केंद्रावर उपस्थित असताना हा प्रकार घडला. संबंधित महिलेला तातडीने थांबवून तिची चौकशी करण्यात आली.
या गोंधळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. संबंधित महिला मतदाराचे आधार कार्ड तपासून आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदानाची परवानगी देण्यात येणार आहे. "हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. यादीत इतक्या मोठ्या चुका असतील तर पारदर्शक निवडणूक कशी होणार?" असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.