तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:36 IST2026-01-02T12:35:44+5:302026-01-02T12:36:29+5:30
मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्याप्रकारचे प्रयत्न केले गेले. परंतु राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले. मराठी माणसात यावेळी कुठलीही फूट पडू देणार नाही असं त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.

तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
मुंबई - महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. त्यात मुंबईत ठाकरे बंधू यांच्या युतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीत एकत्र आले आहेत. मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये उद्धवसेना-मनसे युतीत लढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू संयुक्त वचननामा जाहीर करणार आहे. येत्या ४ जानेवारीला शिवसेना भवनात हा कार्यक्रम होईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त तब्बल २० वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेशिवसेना भवनात जाणार आहेत.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, ४ जानेवारीला राज ठाकरे शिवसेना भवनात येणार आहेत. संयुक्त वचननामा प्रकाशित होणार आहे. त्याबाबत गुरुवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर ४ तारखेला वचननामा प्रसिद्ध केला जाईल. राज ठाकरे त्यासाठी शिवसेना भवनात उपस्थित राहतील. ही सगळ्यांसाठी, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. शिवसेना भवन ही प्रेरणादायी जागा आहे. जिथे हिंदूहदृयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बसून अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण केले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यात बराच काळ राज ठाकरेही सहभागी होते. त्या जागेशिवाय दुसरी जागा आम्हाला दिसत नाही असं त्यांनी सांगितले.
तर पडद्यामागे कुणी ऑफर दिल्या हे आम्हाला माहिती आहे. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्याप्रकारचे प्रयत्न केले गेले. परंतु राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले. मराठी माणसात यावेळी कुठलीही फूट पडू देणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकीमुळे विरोधी भाजपा आणि शिंदेंच्या पोटात गोळा आला आहे. मुंबईत मराठीच महापौर होईल. परंतु आता भाजपाने मुंबईचा महापौर हिंदू होईल असं सुरू केले. हे आम्हाला हिंदुत्व शिकवता, या मुंबईतूनच मराठी माणसाने हिंदूत्वाचा लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते मराठीच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले ते मराठी आहेत. आमच्या नसानसात, प्रत्येक रक्ताच्या थेंबात हिंदुत्व आहे. इथे जय महाराष्ट्र चालणार, जय श्रीराम आमच्या हृदयात आहेत. जय भवानी, जय शिवाजी हाच नारा इथे चालणार असं सांगत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिता लागू आहे मात्र गेल्या २-३ दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा थांबलेला असतो. त्यात काही निवडणूक अधिकारीही आहेत. हे का जातायेत, अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन केले नाही तर ते उमेदवार आणि जनतेला कोणत्या अधिकाराखाली आचारसंहितेचे पालन करायला सांगतायेत. हे सगळे निवडणूक अधिकारी यांचे फोन रेकॉर्ड तपासा. त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले. उपमुख्यमंत्र्यांचे कधी फोन गेले. त्यानंतर कसे अर्ज बाद झाले. अर्ज मागे घ्यावेत यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून अपक्षांवर दबाव आणला जातोय असा आरोपही संजय राऊतांनी केला.