निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:48 IST2025-12-30T18:47:55+5:302025-12-30T18:48:24+5:30
वार्ड क्रमांक १५५ मध्ये चेंबूरमधील सहकार नगर, ठक्कर बाप्पा कॉलनी, वत्सलाबाई नाईक नगर आणि साईबाबा नगरचा समावेश होतो

निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
मुंबई - महापालिका निवडणुकीत ऐनवेळी इतर पक्षातून प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य पसरले आहे. मुंबईत ठाकरे बंधू युतीविरोधात भाजपा महायुतीत निवडणूक लढत आहे. त्यात निवडणुकीपूर्वी इतर पक्षातील बऱ्याच जणांना पक्षप्रवेश दिल्याने वार्डात कुणाला उमेदवारी द्यायची असा मोठा प्रश्न भाजपाला पडला. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिकीट न मिळाल्याने इच्छुकांनी बंडखोरी केल्याचा फटका पक्षाला बसत आहे. चेंबूरमध्येही भाजपात मोठी बंडाळी दिसून आली.
याठिकाणी वार्ड क्रमांक १५५ मध्ये भाजपाने उद्धवसेनेतून पक्षात प्रवेश केलेले श्रीकांत शेट्ये यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकाला तिकीट मिळाल्याने भाजपातील निष्ठावंतांनी नाराजी उफाळून आली. त्यात शेट्ये यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपातील ३ इच्छुकांनी अपक्ष निवडणूक अर्ज भरला आहे. एकाच वार्डातून भाजपाच्या तिघांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने पक्षासमोर ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान उभे राहिले आहे.
वार्ड क्रमांक १५५ मध्ये चेंबूरमधील सहकार नगर, ठक्कर बाप्पा कॉलनी, वत्सलाबाई नाईक नगर आणि साईबाबा नगरचा समावेश होतो. २०१७ च्या निवडणुकीत या वार्डातून श्रीकांत शेट्ये विजयी झाले होते. शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेंद्र नगराळे यांचा पराभव केला होता. शेट्ये यांना ८ हजार १४ मते मिळाली होती. याच वार्डात भाजपाकडून माजी नगरसेविका जयश्री खरात, हर्ष साळवे आणि शशिकला कांबळे या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र या तिघांनाही डावलून पक्षाने उद्धवसेनेतून आलेले माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांना उमेदवारी दिली आहे. आता या वार्डातील बंडखोरी शमवण्यासाठी भाजपा नेतृत्वाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
माजी नगरसेविकेने धरली ठाकरेंची वाट
बोरीवली पूर्व प्रभाग क्र. १४च्या भाजपाच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी नाराजीतून सोमवारी मातोश्रीवर उद्धवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना उमेदवारी दिली. त्याशिवाय उद्धवसेनेलाही माहिमच्या वार्ड क्रमांक १९२ मध्ये बंडखोरीचा फटका बसला. याठिकाणच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली.