मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:36 IST2026-01-13T12:32:26+5:302026-01-13T12:36:51+5:30
भाजपा आणि शिंदेसेना महायुतीला मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आव्हान दिले आहे

मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
मुंबई - राज्यात २९ महापालिकांच्या प्रचाराची सांगता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. १५ जानेवारीला या महापालिका क्षेत्रात मतदान पार पडणार आहे. या सर्व महापालिकांमध्ये सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या मुंबईची सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी भाजपाकडून कंबर कसण्यात आली आहे. मात्र भाजपा आणि शिंदेसेना महायुतीला मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आव्हान दिले आहे. पहिल्यांदाच ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आल्याने मराठी मते एकवटणार का, ठाकरे बंधू यांना खरेच युतीचा फायदा होणार का असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. त्यातच भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठं भाकीत वर्तवले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबईत सगळं काही क्लियर आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळूनच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती होईल. मी संख्या सांगण्यात माहीर मानला जातो. भाजपा आणि शिवसेनेला किती मिळतील हे नंतर कानात सांगतो पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना किती मिळतील हे सांगतो. उद्धव ठाकरे यांना ४५ आणि राज ठाकरेंना २० जागा मिळतील इथेच गाडी संपली, पुढे अकरा म्हणजे १ आणि २...हे महापौर करायला निघालेत असं भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
मुंबईत १५ वार्डात मित्रपक्षांमध्येच लढत
मुंबईत महायुती म्हणून भाजपा शिंदेसेना एकत्र लढत असले तरी जवळपास १५ वार्डात मित्रपक्षांमध्येच लढत होत आहे. ही लढत मैत्रीपूर्ण असल्याचं सांगण्यात येत असले तरी त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वार्ड क्रमांक ३४, १७३ आणि २२५ याठिकाणी भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार आमनेसामने आहेत. त्याशिवाय शिंदेसेनेचे उमेदवार असलेले वार्ड क्रमांक ९३, ११९, १२५, १८१, १४८,१८८ याठिकाणी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.
उमेदवारी घोषित न करता पक्षाकडून फॉर्म ए आणि बी दिले गेल्याने मुंबईतील १५ वार्डात महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे आहेत. यंदा भाजपा, शिंदेसेना, रिपाइ महायुतीमधील जागांचे वाटप शेवटपर्यंत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही माहिती झाले नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र बंडखोरी शमविण्यात भाजपा-शिंदेसेनेला यस आले. अधिकृत उमेदवाराला सहकार्य न केल्याने भाजपाने २६ जणांना ६ वर्षासाठी निलंबित केले आहे.