मुंबई - कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. नार्वेकरांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्यांचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याशी वाद झालेला दिसून येतो. त्यात नार्वेकर यांनी राठोड यांची सुरक्षा काढून टाकण्याचे आदेशच सहपोलीस आयुक्तांना फोनवरून दिले. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांशी पंगा का घेताय अशी भाषा नार्वेकरांनी वापरल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी पुढे आणताच हरिभाऊ राठोड यांनीही त्यावर खुलासा केला आहे.
हरिभाऊ राठोड म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचे भाऊ, वहिनी यांना बिनविरोध विजयी करण्यासाठी राहुल नार्वेकरांनी विरोधी उमेदवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्ज भरण्याच्या दिवशी ते ५ वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयातच थांबले होते. तिथे जाणुनबुजून अधिकाऱ्यांकडून वेळ काढूपणा केला जात होता. विरोधकांनी अर्ज भरू नये अशाप्रकारे धमकावले जात होते. आम्ही १२ लोक अर्जासह उभे होतो. परंतु फॉर्म भरून दिले नाही. ९ वाजल्यापासून उमेदवार उभे होते. असंविधानिक गोष्टी तिथे घडल्या. मुख्यमंत्र्यांचा दबाव आणि राहुल नार्वेकरांनी दबाव आणून हा प्रकार केला. देशात संविधान आहे की नाही, लोकांनी राहायचे की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच निवडणूक आयोगाचे कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. या प्रकारात पोलीस आणि निवडणूक आयोग जबाबदार आहेत. आमच्याकडून पैसे भरून घेतले परंतु अर्ज घेतले नाही. सगळ्या पक्षांनी एबी फॉर्म उशिरा दिले त्यामुळे तिथे गर्दी झाली होती. निवडणूक अधिकारी यांना निलंबित केले पाहिजे. राहुल नार्वेकर आम्हाला धमकी देत होते. मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घेता आणि आमच्याविरोधात अर्ज भरता का असं त्यांनी विचारा. तुम्हाला सुरक्षा कुणी दिली, राहुल नार्वेकरांने डीसीपीला फोन करून विचारणा केली असंही हरिभाऊ राठोड म्हणाले.
दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. जर मला उद्या काही झाले तर ते जबाबदार असतील, कारण याचे सर्व सीसीटीव्ही रेकॉर्ड झाले असेल. तुम्ही अध्यक्ष आहात हे शोभत नाही. संविधानिक पदावर आहात. एका कार्यकर्त्यासारखे ते फिरत होते असं मी त्यांना सांगितल्यावर तुमचे सर्व विशेषाधिकार मी काढून घेईन असं नार्वेकरांनी म्हटलं. त्यावर तुम्ही मला फासावरही चढवू शकता असं मी म्हटल्यावर हे तुम्हाला माहिती आहे तरी माझ्याशी पंगा कशाला घेता असा इशाराच राहुल नार्वेकरांनी दिल्याचा आरोप राठोड यांनी केला.
राहुल नार्वेकरांनी फेटाळला आरोप
नेमका तिथे जो प्रकार झाला तो मला आठवत नाही. परंतु ५ वाजून गेले होते. तिथे काही उमेदवारांचे अर्ज भरणे बाकी होते, त्यांना तुम्ही अर्ज भरायला देणार का असं मी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले. तर त्यांनी वेळ निघून गेल्याने आता अर्ज भरता येत नाही असं सांगितले. तेवढं बोलून मी बाहेर आलो तेव्हा काही जणांनी माझ्याभोवती घोळका केला. माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडून बेकायदेशीर कृत्य करून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मी तयारी दाखवली नाही म्हणून अशाप्रकारे माझ्याविरोधात खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगत राहुल नार्वेकरांनी राठोड यांचे आरोप फेटाळले.
Web Summary : MLA Rahul Narvekar faces allegations after a video surfaced showing a dispute with Haribhau Rathod. Rathod accuses Narvekar of threatening opponents during elections and misusing his position. Narvekar denies the charges, claiming they are false rumors.
Web Summary : विधायक राहुल नार्वेकर पर हरिभाऊ राठौड़ के साथ विवाद का वीडियो सामने आने के बाद आरोप लगे। राठौड़ ने नार्वेकर पर चुनाव के दौरान विरोधियों को धमकाने और पद का दुरुपयोग करने का आरोप लगाया। नार्वेकर ने आरोपों को झूठी अफवाह बताते हुए खारिज किया।