आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 07:55 IST2025-12-16T07:53:40+5:302025-12-16T07:55:14+5:30
मुंबईसाठी रस्ते काँक्रिटीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सोबतच शिंदेंनी ठाण्यासाठी १२ प्रकल्पांची घोषणा केली.

आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १५ डिसेंबरला राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. मात्र आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धावपळ पाहायला मिळाली. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर सोमवारी सकाळपासून विविध प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन आणि कोट्यवधीच्या घोषणांचा सपाटा लावल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात किमान १५ प्रस्ताविक प्रकल्पांची घोषणा केली तर मुंबईतील भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी शहरात २९ प्रकल्पांचे अनावरण केले. राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यात प्रामुख्याने मुंबई महापालिकेवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेच्या आधी लहान मोठे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले. बड्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मी रेसकॉर्सवर सेंट्रल पार्क उभारणीचा आढावा घेतला. वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सेंट्रल पार्कची शहरासाठी एक मोकळी जागा म्हणून विकसित करण्याची कल्पना आहे, ज्यामध्ये जमिनीखाली एक जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल समाविष्ट असेल. पदपथांच्या कामांव्यतिरिक्त सेंट्रल पार्कचा परिसर कोणत्याही काँक्रीटच्या बांधकामाशिवाय एक पूर्ण विकसित उद्यान म्हणून विकसित केला जाईल असंही आढावा बैठकीतून समोर आले.
📍 #मुंबई |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 15, 2025
मुंबईकर नागरिकांसाठी सर्वांत मोठे गिफ्ट ठरणाऱ्या, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा विकास आराखडा आज सादर करण्यात आला.
हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल… pic.twitter.com/xANehaX08p
त्याशिवाय मुंबईसाठी रस्ते काँक्रिटीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सोबतच शिंदेंनी ठाण्यासाठी १२ प्रकल्पांची घोषणा केली. ज्यात व्ह्यूइंग टॉवर, स्नो पार्क आणि मनोरंजन पार्क यांचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनीही शहरात विविध कामांचे भूमिपूजन केले. शेलार यांनी आपल्या दिवसाची सुरुवात घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळच्या नवीन इमारतीच्या संकुलाची पायाभरणी करून केली आणि नंतर वेस्टर्न एक्सप्रेसला वांद्रे-वरळी सी-लिंकशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रॅम्पची पायाभरणी केली. त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद तलावाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रकल्पाची घोषणा शेलारांनी केली तसेच खार दांडा आणि गाझदरबंध परिसरातील गटार व्यवस्था, पदपथ आणि बाजारपेठांच्या सुधारणांसारख्या अनेक विकासकामांचे भूमिपूजनही केले. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांव्यतिरिक्त शेलार यांनी बीएमसीच्या 'हेल्थ चॅटबॉट' सेवेचेही उद्घाटन केले, ज्याचा उद्देश आरोग्य सेवांच्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणणे आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये एसव्ही रोडवरील ओशिवरा नदीवरील महत्त्वाचा पूल भाजपाच्या गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभात हिरवा झेंडा दाखवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शहराच्या मुख्य भागात काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी भुलेश्वर येथील इब्राहिम रहमतुल्ला रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या कामांचे उद्घाटन केले. हा प्रकल्प बीएमसीने ४.५ कोटी रुपये खर्चून पूर्ण केला आहे. सोमवारच्या या भूमिपूजन समारंभांची मालिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी रविवारी नाहूर येथील प्रस्तावित 'एक्झॉटिक बर्ड पार्क'ची पायाभरणी केल्यानंतर लगेचच सुरू झाली.
घाटकोपर पूर्व, राजावाडी येथील सेठ व्ही.सी. गांधी व एम.ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केले.
या कार्यक्रमास आमदार राम कदम, आमदार पराग शाह, जिल्हाध्यक्ष दिपक दळवी, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेविका रितू तावडे, माजी… pic.twitter.com/pa60IXDrSW— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 15, 2025