“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:13 IST2026-01-05T06:12:42+5:302026-01-05T06:13:28+5:30
भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चुकीचे पायंडे पाडून भाजप-शिंदेसेना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकाराचा दुरुपयोग, दमदाटी आणि पक्षपाती वर्तन केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा संयुक्त ‘शिवशक्तीचा वचननामा’ रविवारी प्रसिद्ध झाला. त्यावेळी ठाकरे म्हणाले, संरक्षण देणे आणि काढून घेणे, हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना केवळ सभागृहात असतो. बाहेर कुणाचेही संरक्षण काढण्याचा अधिकार त्यांना नाही. नार्वेकर स्वतःला ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर समजत आहेत, अशी टीका करत निवडणूक आयोगाने याची दखल घेत नार्वेकर यांना निलंबित करावे आणि
गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
डोममध्ये अनेक ‘डोमकावळे’ जमा झाले होते
डोममध्ये अनेक ‘डोमकावळे’ जमा झाले होते. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असावा, असे म्हणणाऱ्यांपैकी अनेकजण आमच्यातून गेलेले गद्दार आहेत, अशी टीका करत भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? असा सवाल ठाकरे यांनी केला. मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आणि शिंदे यांनी अरबी समुद्र निर्माण केला, असेच म्हणावे लागेल, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.