ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:40 IST2025-12-28T12:39:40+5:302025-12-28T12:40:42+5:30
BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
BMC Election 2026: राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अद्यापही जागावाटपावर खल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम असून, मातोश्रीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत ठाकरे बंधू १५ जागाच देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ठाकरे बंधूंकडून अपेक्षित प्रतिसाद येत नसल्याने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कोंडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई महापालिकेत किमान २५ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याची मागणी ठाकरे बंधूंकडे करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. या ९ जागांसह एकूण २५ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या प्रभागात चांगला जनाधार आहे, अशा ठिकाणच्या जागा मिळाव्यात, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. पण, ठाकरे बंधूंनी फक्त १५ जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. या १५ जागांमधील निम्म्या जागा राष्ट्रवादीच्या सोयीच्या आहेत, तर निम्म्या जागा जिथे राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही, अशा ठिकाणच्या आहेत, असे म्हटले जात आहे.
ठाकरे बंधूंकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र
मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसोबत लढविण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. असे असले तरी ठाकरे बंधूंकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघाला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.
ज्या प्रभागात चांगले दावेदार, उमेदवार तेथील जागा सोडाव्यात
ज्या प्रभागात उमेदवार आहेत, चांगले दावेदार आहेत, त्या ठिकाणच्या जागा सोडाव्यात, अशी मागणी असली तरीही ठाकरे बंधूकडून त्याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. पण, सायंकाळपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. आम्हाला ज्या १५ जागा सोडण्याची तयारी आहे, त्या तरी किमान राष्ट्रवादीच्या सोयीच्या जागा असाव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना- मनसेत जागावाटपाचा तिढा कायम
मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी वरळी, शिवडी, माहीम, विक्रोळी आणि भांडुप या पाच विधानसभा मतदारसंघांतील पालिका प्रभागाच्या जागांवरून दोन्ही पक्षांचे जागावाटप रखडले आहे. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून येऊ लागली असून, बंडखोरी आणि पक्षांतर टाळण्यासाठी उमेदवारी याद्या जाहीर न करताच संबंचित उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.