“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:28 IST2025-12-31T13:24:23+5:302025-12-31T13:28:56+5:30
Sanjay Raut News: शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सर्वांनी वाजत-गाजत काल अर्ज भरले आहेत. मनसेच्या उमेदवारांनीही अशाच पद्धतीने अर्ज भरले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
Sanjay Raut News: शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सर्वांनी वाजत-गाजत काल अर्ज भरले आहेत. मनसेच्या उमेदवारांनीही अशाच पद्धतीने अर्ज भरले आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही. राज ठाकरे मातोश्रीवर होते. कोहळा मेळावा म्हणून ते आले होते का? मातोश्रीतून ते हसत हसत बाहेर पडतानाचे व्हिडीओ वाहिन्यांवर दिसले, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली. १४ महानगरपालिकांमध्ये महायुती तुटलेली आहे. अनेक शहरांत महायुतीत लोक एकमेकांच्या छाताडावर बसले आहेत. नाशिक, संभाजीनगर ते ठाण्यामध्ये महिला, मुलींनी उमेदवारीसाठी कसा आक्रोश केला, हेदेखील चित्र टीव्हीवर दिसले, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा
राज ठाकरेंच्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून याव्यात, अशी आमची इच्छा आणि भावना आहे. कारण त्यांच्या पक्षानेही जास्तीत जास्त जागा जिंकल्या तर शिवसेनेने जिंकलेल्या जागांना किंमत उरेल. तरच आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकतो. राज ठाकरेंच्या मनसेनेही मिळालेल्या जागांपैकी ८० टक्के जागा जिंकायला हव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांनी अपक्ष किंवा इतर पक्षातून अर्ज भरला ते बंडखोर वगैरे काही नाहीत. या पक्षात तिकीट मिळाले नाही, म्हणून दुसऱ्या पक्षात जायचे याला बंड म्हणत नाहीत. या देशात १८५७ रोजी एकच बंड झाले. त्यानंतर कोणतेही बंड झालेले नाही. तिकीटासाठी बंड करणाऱ्यांची निष्ठा तिकीटावर आहे की पक्षावर आहे? असा प्रश्न बाळासाहेब ठाकरे नेहमी विचारायचे. ज्यांची तिकीटावर निष्ठा होती, ते निघून गेले. इकडे तिकीट नाकारल्यानंतर तिकडे जर दुसऱ्या मिनिटांला उमेदवारी मिळत असेल, याचा अर्थ तो गेल्या दहा दिवसांपासून त्या पक्षाच्या संपर्कात आहे. उमेदवारी घेणे एवढे सोपे नसते. याला निष्ठावंत किंवा बंडखोर म्हणता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.