Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:28 IST2026-01-13T16:25:11+5:302026-01-13T16:28:48+5:30
Uday Samant on Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केलेल्या टीकेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
राज्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत महायुती सरकार आणि उद्योगपती अदानी यांच्यावर केलेल्या टीकेला आता राज्य सरकारने प्रत्युत्तर दिले . "काही लोकांना काँग्रेसचा वाण नाही तर गुण लागला आहे," अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वैयक्तिक टीकेचा समाचार घेताना सामंत म्हणाले की, "मी देखील मराठी आहे आणि मुख्यमंत्रीही मराठीच आहेत. एकीकडे आपण मराठी असल्याचा अभिमान सांगतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आई-वडिलांबद्दल बोलतो, हे मराठी माणसाचे संस्कार असू शकत नाही. मराठी माणूस सुसंस्कृत आहे, पण सध्या काही लोकांची भाषा बदलली आहे."
राज ठाकरेंनी अदानी समूहावरून केलेल्या टीकेवर उत्तर देताना सामंत यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "जे लोक अदानींना जेवायला बोलावतात, त्यांच्याकडे जेवायला जातात आणि त्यांच्याच विमानातून फिरतात, त्यांनाच आता अदानींची ॲलर्जी का? अदानींच्या नावाने टाहो फोडणे हा केवळ मतांसाठी केलेला प्रयत्न आहे. उद्योगधंद्यांवर चर्चा करताना उद्योजक कुठल्या प्रांतातला किंवा समाजाचा आहे, यापेक्षा तो किती तरुणांना रोजगार देणार, हे महत्त्वाचे आहे.
'मुंबईतून बाहेर गेलेल्या ४० लाख मराठी माणसांना परत आणणार'
उदय सामंत यांनी महायुतीचा आगामी अजेंडा स्पष्ट करताना सांगितले की, "मुंबईतून ४० लाख लोकांना बाहेर काढण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. याच मराठी माणसांना पुन्हा मुंबईत सन्मानाने आणण्याचे काम महायुती पुढील पाच वर्षांत करणार आहे. हाच आमच्यातील आणि त्यांच्यातील फरक आहे."
महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा!
विरोधकांनी कितीही 'बोंबाबोंब' केली तरी वस्तुस्थिती जनतेसमोर आहे. कुणाचीही बदनामी न करता आणि शिवीगाळ न करता आमचे नेते काम करत आहेत. त्यामुळे येत्या १६ तारखेला मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.