मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
By यदू जोशी | Updated: January 7, 2026 06:50 IST2026-01-07T06:49:05+5:302026-01-07T06:50:36+5:30
मुंबई हातातून गेली तर ठाकरे ब्रँड हा ‘भावनिक इतिहास’ ठरेल; मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भलेमोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.

मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क: देवींची साडेतीन शक्तिपीठे आहेत, तशी मुंबईकर मराठी माणसाची दोन शक्तिपीठे आहेत, एक ‘मातोश्री’ आणि दुसरे दादरचे ‘सेनाभवन’. ती पुढेही कायम राहतील की त्यांना आणखी उतरती कळा लागेल, हे १६ जानेवारीला कळेल. स्वत:ची राजकीय ओळख पुन्हा ठामपणे उभी करणे आणि ठाकरे ब्रँड जिवंत ठेवणे असे दुहेरी आव्हान आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.
एकत्र आलेल्या बंधूंची कसोटी लागणार...
सत्ता, आमदार आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी नेले. या पडझडीनंतरही महापालिकेत शिवसैनिक, मराठी मतदार हा ठाकरेंसोबतच राहिला का हे निकालात कळणार आहे. २०१९ च्या विधानसभेत सोबत असलेली काँग्रेस मुंबई महापालिकेत वेगळी लढत आहे.
इतकी वर्षे ठाकरे ब्रँड हा दोन भावांमध्ये विभागला गेला होता, आता एकत्रित ठाकरे ब्रँडची कसोटी आहे. मुंबईकर मराठी माणसाच्या भावनेवर, अस्मितेवर ठाकरे ब्रँडने वर्षानुवर्षे राज्य केले आहे. ही अस्मिता तशीच कायम टिकवून भावाच्या मदतीने मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भलेमोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.
मुंबई हातातून गेली तर ठाकरे ब्रँड हा ‘भावनिक इतिहास’ ठरेल; जिंकली तर तो पुन्हा ‘राजकीय वर्तमान’ बनेल. मातोश्री अजूनही भावनिक केंद्र आहे, सेनाभवन अजूनही आठवणींचा किल्ला आहे. या आठवणींच्या भक्कम आधारे, वर्तमानाचा वेध घेत आपले भवितव्य ठाकरेंच्याच हातात सुरक्षित असल्याची ग्वाही मुंबईकर देतात का, याच्या फैसल्याची घडी नजीक येऊन ठेपली आहे. राज्यातील सत्ता गेली तेव्हा ठाकरे संपले नाहीत; पण, आता सत्ता गेली तर ते नक्कीच थांबतील अन् सत्ता आली तर त्यांचे वर्तमान मजबूत असेल आणि भविष्यही.
श्रद्धा आणि मतदान
सत्ता नसताना अस्मितेचे राजकारण करता येते; पण, सत्ता मिळविण्यासाठी संघटन, शिस्त आणि आकडेमोड लागते, पडझडीमुळे ठाकरेंच्या हातून या तिन्ही गोष्टी निसटत चालल्या असून, तीच त्यांच्यासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे. किती लोक ठाकरेंवर प्रेम करतात याहीपेक्षा आजच्या घडीला महत्त्वाचे आहे की त्यातील किती लोक त्यांना मतदान करतात.
मातोश्रीवरील श्रद्धा आणि त्याचे ईव्हीएममध्ये रूपांतर हे जसेच्या तसे राहिले तर ठाकरेंचे कमबॅक नक्की असेल. सत्ता गमावणे ही पराभवाची शेवटची पायरी नसते; पण, सत्ता परत मिळविण्यात अपयश येणे ही राजकीय अखेराची सुरुवात असते.