युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच: संदीप देशपांडे; तिकीट वाटपावरून मनसेत असंतोष आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 07:40 IST2026-01-10T07:40:25+5:302026-01-10T07:40:25+5:30
Lokmat Exclusive Interview: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, पण पहिल्याच निवडणुकीत युतीतले अंतर्गत तणाव उघड झाले.

युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच: संदीप देशपांडे; तिकीट वाटपावरून मनसेत असंतोष आहे का?
सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, पण पहिल्याच निवडणुकीत युतीतले अंतर्गत तणाव उघड झाले. जागावाटपावरून निर्माण झालेली रस्सीखेच, नाराजी आणि पक्ष सोडण्याचे सत्र, यावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी थेट आणि परखड भूमिका ‘लोकमत’कडे मांडली. “युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच,” असे स्पष्ट करताना त्यांनी मुंबईच्या राजकारणातील वास्तवावर बोट ठेवले.
मनसे केवळ ‘प्रेशर पॉलिटिक्स’पुरतीच मर्यादित आहे, असा आरोप सातत्याने होतो यावर काय म्हणाल?
देशपांडे : सत्ता हाच राजकारणाचा एकमेव मापदंड आम्ही मानत नाही. मनसेने सत्तेबाहेर राहून सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरवले आहे. रस्ते असोत, टोलनाके असोत, रुग्णालये किंवा शाळांचे प्रश्न असोत, आम्ही केवळ टीका केली नाही, तर संघर्ष केला. सत्ता नसतानाही आम्ही काम करून दाखवले आहे. प्रशासन चालवण्यासाठी केवळ खुर्ची नव्हे, तर प्रामाणिक इच्छाशक्ती लागते आणि ती मनसेकडे आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स, शहरी नियोजन तज्ज्ञ आणि अनुभवी व्यावसायिकांची टीम आम्ही सज्ज ठेवली आहे. आता केवळ दबाव नव्हे, तर सत्ता आणण्याची वेळ आली आहे.
मराठी विरुद्ध परप्रांतीय असा मुद्दा उचलून मनसे समाजात तेढ निर्माण करते आहे का?
देशपांडे : आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, पण मराठी माणसाचा अपमान झाला तर शांत बसणारही नाही. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर गदा आली, तर मनसे रस्त्यावर उतरणारच. आमचा लढा नेहमी कायद्याच्या चौकटीत असतो. सत्ताधाऱ्यांनी मुंबईची काय अवस्था केली आहे, हे मुंबईकर रोज अनुभवत आहेत. नाशिकमध्ये आम्ही बदल घडवून दाखवला. आता मुंबईतही मनसेला एक संधी देण्याची वेळ आली आहे. यावेळी मुंबईकर मराठी स्वाभिमानासाठी मतदान करतील.
ठाकरे बंधू एकत्र आले असतानाही मनसेत नाराजी आहे, तिकीट वाटपावरून असंतोष आहे का?
देशपांडे : युती असेल तर नाराजी अपरिहार्य असते. दोन-तीन पक्ष एकत्र आले की काही जण नाराज होणारच. पण एक-दोन जागांपुरता विचार न करता संपूर्ण मुंबईचा विचार करायला हवा. पक्षासाठी काही वेळा वैयक्तिक त्याग करावा लागतो.
मनसेचा अंतिम उद्देश नेमका काय... सत्ता, किंगमेकर की अस्तित्व टिकवणे?
देशपांडे : मनसे हा केवळ राजकीय पक्ष नाही, तो एक विचार आहे. मुंबईतील मराठी माणूस हीच आमची खरी ताकद आहे. सत्ता हे आमचे अंतिम लक्ष्य आहे, यात दुमत नाही. मात्र त्याच वेळी मुंबईत प्रामाणिक, निर्भीड व आक्रमक विरोधक म्हणून मनसेची भूमिका कायम राहणार आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर कोणतीही तडजोड होणार नाही.