बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या; पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच दिसली: राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:31 IST2026-01-04T05:29:00+5:302026-01-04T05:31:03+5:30
उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून करणार आहेत.

बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या; पण अशी परिस्थिती पहिल्यांदाच दिसली: राज ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या; परंतु इतक्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार निवडून येणारी निवडणूक पहिल्यांदा पाहत आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी बिनविरोध निवडीवरून केले.
राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे राज्यभरात ७० उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे ठाण्यातील मनसे शहराध्यक्ष यांनीही ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, माजी आ. नेते राजू पाटील व अभिजीत पानसे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज यांची भेट घेतली.
ठाणे व कल्याण-डोंबिवली येथे घडलेल्या प्रकाराचे पुरावे या नेत्यांनी राज यांच्याकडे दिले. हे उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल राज हे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड व व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहेत. तर याप्रकरणी बिनविरोध उमेदवार व त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला आहे. तसेच, राज्य निवडणूक आयुक्तांचीही मनसेचे प्रमुख नेते भेट घेणार आहेत.