हातात ९ महिन्याचे बाळ, मराठी आदिवासी कुटुंबाला मारहाण; मुंबईत प्रचारास आलेल्या उत्तर भारतीयांचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:44 IST2026-01-07T07:43:16+5:302026-01-07T07:44:01+5:30
प्रचारासाठी आलेल्या उत्तर भारतीयांच्या एका गटाने मराठी आदिवासी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

हातात ९ महिन्याचे बाळ, मराठी आदिवासी कुटुंबाला मारहाण; मुंबईत प्रचारास आलेल्या उत्तर भारतीयांचा प्रताप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणूक प्रचारासाठी घरात का घुसलात, अशी विचारणा करणाऱ्या दहिसरमधील मराठी आदिवासी कुटुंबाला एका उमेदवाराच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. संबंधित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकाचे काम करणारे विजय पाटील पत्नी, लहान मूल आणि भाऊ प्रशांत यांच्यासह दहिसर पश्चिम भागातील कांदरपाडा येथे राहतात. पाटील यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता ते, पत्नी आणि भाऊ घरी असताना परिसरातील रहिवासी सूरज पांडे आणि सूरज यादव कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारासाठी थेट घरात घुसले. त्यांना विचारल्यावर दोघांनी शिवीगाळ सुरू केली. पाटील आणि त्यांच्या भावास मारहाण केली. त्यानंतर पांडे आणि यादव यांनी फोन करून त्यांचे साथीदार अजय मौर्या, दशरथ पाल, राकेश यादव, दीनानाथ यादव, सभय यादव, पप्पू यादव, मेहिलाल यादव तसेच एक महिला आणि इतरांना तेथे बोलावले.
जमावाने पाटील आणि त्यांच्या भावास जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. राकेश यादव याने बांबूने हल्ला करून दोघांना जखमी केले. पाटील यांची पत्नी प्रमिला यांनी तत्काळ १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात पाठवले. उपचारानंतर पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
हातात नऊ महिन्यांचे बाळ तरीही लाठ्यांनी मारहाण
तक्रारदाराची पत्नी प्रमिला पाटील म्हणाल्या, “आम्ही आदिवासी आहोत. मी माझ्या नऊ महिन्यांच्या बाळासह घरात होते. अचानक एक जण प्रचार इधर करना है, क्या? असे म्हणत आमच्या घरात घुसला. तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी त्याला घराबाहेर जायला सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने फोन करून प्रचारासाठी आलेल्या ५० जणांना बोलावले. त्यांच्यासोबत पोलिसही नव्हते. जमावाने माझे पती आणि दिराला रस्त्यात दगड, झेंड्याच्या दांड्यांनी मारहाण केली. पोलिस तक्रार घ्यायला तयार नव्हते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला.