भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:10 IST2026-01-04T13:10:15+5:302026-01-04T13:10:55+5:30
उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यासह २० ते २५ महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भांडुपपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये राजकारण तापले असताना ११५ मधील मनसेच्या माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रभागात भाजपकडून स्मिता संजय परब निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात प्रभाग ११५ मध्ये मनसेच्या ज्योती अनिल राजभोज उमेदवार आहे. वैष्णवी या प्रभागातून इच्छुक होत्या. मात्र उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यासह २० ते २५ महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
शुक्रवारी रात्री भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेत परब यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यादरम्यान सरफरे यांच्यासह श्वेता महाडिक, राजश्री पालांडे आणि उपशाखाध्यक्ष कार्यकर्त्या तसेच पूर्व काँग्रेस उमेदवार डॉ. प्रेम सिंह व सहकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे भांडुपच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली असून निवडणूक चुरशीही होणार आहे.