अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:41 IST2026-01-01T14:41:20+5:302026-01-01T14:41:31+5:30
BMC Election 2026: मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली असतानाच मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने नेमके काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
BMC Election 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष मुंबई मनपा निवडणुकीवर आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे या निवडणुकीत चुरस वाढू शकते, असा कयास बांधला जात आहे. युती असूनही मुंबईतील एका जागेवर मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक ६७ येथे मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली. वॉर्ड क्रमांक ६७ मध्ये ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही उमेदवारांची नावे असल्याचे आढळून आले आहे. या मतदारसंघातील एक उमेदवार माघार घेणार की, या एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. मुंबईच्या प्रभाग क्रमांक ६७ मध्ये मनसे आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने इथे नेमके काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरी पश्चिमेला या प्रभागातून मनसेने कुशल धुरी यांना मैदानात उतरवले आहे. उद्धवसेनेकडून शरद जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक ६७ मध्ये काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ०२ जानेवारी ही शेवटची मुदत आहे. जागावाटपात ज्या पक्षाच्या वाट्याला ही जागा आली, त्या पक्षाचा उमेदवार कायम राहील. दुसऱ्या उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे, असे चित्र आहे. मात्र, उमेदवारी मागे घेतली जाते की, मैत्रीपूर्ण लढत होते, हे लवकरच समजेल.
दरम्यान, भाजपाने दीपक कोतेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पार्टीने प्रकाश कोकरे आणि वंचितने पीर मोहम्मद शेख यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डात मनसे, ठाकरे गट, भाजपा आणि वंचित यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.