Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:58 IST2026-01-08T15:55:04+5:302026-01-08T15:58:17+5:30
BMC Election 2026: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती लपवल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत पेडणेकरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
नेमका आरोप काय?
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती उघड केलेली नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवाराला आपल्यावर असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक असते. पेडणेकर यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपवली असून, हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
"कोविड काळात बॉडी बॅग कथित घोटाळा केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल आहे. तरवरळीतील गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील झोपडपट्टीवासीयांचे गाळे बळकावल्याच्या आरोपावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांनी ही सर्व माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मी पुराव्यानिशी तक्रार दिली असून, आता त्यांची चौकशी होणार आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई देखील होणार," असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा लावून धरल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर आता किशोरी पेडणेकर किंवा ठाकरे गटाकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर पेडणेकर यांच्यावर अपात्रतेची किंवा फौजदारी कारवाईची टांगती तलवार असू शकते.