मुंबईत शिंदेसेनेला उपमहापौर पदावर मानावे लागणार समाधान; गणित पहिल्यांदाच बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 06:53 IST2026-01-23T06:53:13+5:302026-01-23T06:53:54+5:30
महापौरपदावर तडजोड न करण्याची भाजपची भूमिका

मुंबईत शिंदेसेनेला उपमहापौर पदावर मानावे लागणार समाधान; गणित पहिल्यांदाच बदलणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतल्याने आता शिंदेसेनेला उपमहापौरपदावरच समाधान मानावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. गेली २५ वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असे गणित होते, ते यंदा पहिल्यांदाच बदलण्याची शक्यता आहे.
महापालिकेत यंदा प्रथमच भाजप सगळ्यात मोठा पक्ष असून, महापौरपदावर भाजप ठाम आहे. शिंदेसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौरपद द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती; पण, भाजपकडून मान्य न झाल्याचे समजते. परिणामी, शिंदेसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार असल्याचे चिन्ह आहे. महापौरपदासाठी आम्ही आजही आग्रही आहोत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी बैठक होऊन अंतिम निर्णय होईल. पण, महापौरपद नाहीच मिळाले तर उपमहापौरपद घेऊ, असे शिंदेसेनेच्या एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
यांच्या नावाची चर्चा : शिंदेसेनेकडून उपमहापौरपदासाठी समृद्धी काते, शैला लांडे, अश्विनी माटेकर यांची नावे चर्चेत असून, तृष्णा विश्वासराव, संध्या दोषी, अंजली नाईक यांच्यासारख्या आक्रमक नगरसेविकांचा विचार स्थायी समिती, शिक्षण समितीसाठी केला जाईल, अशी शक्यता आहे.
...आणि उपमहापौरपद कायम
१९९८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुंबई आणि नागपूर महापालिकेत महापौरांना कार्यकारी अधिकार देणारी ‘महापौर परिषद’ ही पद्धत लागू केली. त्यात प्रथमच उपमहापौर हे नवे पद निर्माण करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे नंदू साटम हे महापौर झाले तर पहिले उपमहापौर म्हणून भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी मान मिळवला. त्यानंतर वर्षभरात महापौर परिषद रद्द झाली; पण, उपमहापौर हे पद कायम राहिले.