'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:16 IST2026-01-05T13:07:22+5:302026-01-05T13:16:25+5:30
Mumbai Municipal Corporation Election: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती यांच्यात मुख्य लढत होताना दिसत आहे. तसेच या निवडणुकीमध्ये मुंबईमधील मराठी माणसाचे प्रश्न, मराठी अस्मिता याबरोबरच खरी शिवसेना कुणाची हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका प्रचारसभेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ असलेले एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत, तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा हा महायुतीकडे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो. पण विचारांचा वारसा हा कर्माने मिळत असतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुंबई महानगपालिका निवडणुकीतील एका प्रचारसभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘’आमच्यासोबत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे हे देखील आहेत. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो. पण विचारांचा वारसा हा कर्माने मिळत असतो. तो विचारांचा वारसा आमच्याकडे आहे. तो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तो शिवसेनेकडे आहे. तसेच तो आमच्या महायुतीकडे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील विकासकामांबाबतही मोठं विधान केलं. एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जेवढं मिळालं, तेवढं मुंबईबद्दल आव आणून आणून बोलतात, त्यांच्याही काळात मिळालेलं नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना लगावला. तसेच ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही, अशा शब्दात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचला जातोय, असा आरोप करणाऱ्या ठाकरे बंधूंनाही फडणवीस यांनी सुनावले.